भावुक विराटने लय गमावली
By admin | Published: April 1, 2017 01:10 AM2017-04-01T01:10:28+5:302017-04-01T01:10:28+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत कर्णधार विराट कोहली भावनेच्या आहारी गेल्यामुळे फलंदाजीतील लय गमावली. कर्णधार या
दुबई : आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत कर्णधार विराट कोहली भावनेच्या आहारी गेल्यामुळे फलंदाजीतील लय गमावली. कर्णधार या नात्याने कुठल्याही स्थितीत विजय मिळवायचाच असा निर्धार केल्यामुळे विराटवर भावनांचे ओझे झाले असावे. विराट शांतचित्ताने पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास सज्ज होईल, अशी अपेक्षा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने व्यक्तकेली आहे.
आयसीसीच्या वेबसाईटवरील विशेष स्तंभात गांगुलीने लिहिले, ‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजयासाठी विराट इतका उत्सुक होता की, भावनेच्या भरात स्वत:च्या फलंदाजीची ‘वाट’ लावली. त्यासाठी हा धडा आहे. इतका प्रभावशाली फलंदाज संपूर्ण मालिकेत ‘फ्लॉप’ ठरल्याचे शल्य मलादेखील आहे. तो शांत होईल आणि मोठी खेळी करेल, अशी मी अपेक्षा बाळगतो.’
मालिकेआधी कोहली जबर फॉर्ममध्ये होता. सलग चार मालिकांमध्ये दुहेरी शतके ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज बनला होता. सध्याच्या सत्रात १३ सामन्यांत त्याच्या नावावर १४५७ धावांची नोंद झाली. आॅस्ट्रेलियाविरुद्ध मात्र तीन सामन्यांतील पाच डावांत ००, १३, १२, १५ आणि ६ अशा केवळ ४६ धावा काढू शकला. खांद्याच्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीत विराटला मुकावे लागले होते.
हाच धागा पकडून गांगुली म्हणाला, ‘माझ्यासाठी विराटच्या दोन भूमिका आहेत. एक फलंदाज आणि दुसरा कर्णधार. फलंदाज म्हणून त्याच्यात धावा काढण्याची भूक आहे. कर्णधार म्हणूनही तो जिद्दी स्वभावाचा आहे. दररोज विजय मिळविण्याची जिद्द त्याच्यात आहे, पण दररोज जिंकणे शक्य नाही, हे विराटने डोक्यात ठेवायला हवे.’
या मालिकेतून रवींद्र जडेजा, लोकेश राहुल आणि उमेश यादव, चेतेश्वर पुजारा यांचा आत्मविश्वास बळावल्याचे सांगून गांगुली पुढे म्हणाला, ‘विदेशात मालिका जिंकण्यासाठी या खेळाडूंची फार मोठी मदत होणार आहे. सध्याच्या भारतीय संघात जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात विजय मिळविण्याची क्षमता आहे. मागच्या १३ कसोटींचा निकाल पाहिल्यानंतर विराट अॅन्ड कंपनी आता भारताबाहेर विजयाचा ध्वज उंचावेल, यात शंका नाही.
धरमशाला कसोटीबद्दल गांगुली लिहितो, ‘मी तिसऱ्या दिवशी घरी टी.व्ही. पाहात असताना आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव उमेश आणि भुवनेश्वर यांच्या वेगवान माऱ्यापुढे कोसळायला सुरुवात झाली. विराट आणि कुंबळे यांनी मैदानाबाहेरून दिलेल्या पाठिंब्यामुळे आॅस्ट्रेलियाला अनुकूल असलेल्या स्थितीत भारताचा विजय साकार झाला. याचे श्रेय सांघिक परिश्रमांना द्यायला हवे.’ (वृत्तसंस्था)