मिळालेल्या प्रेमामुळे मुंबई सोडण्याची इच्छा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 03:17 AM2017-07-20T03:17:53+5:302017-07-20T03:17:53+5:30
यंदाचा मोसम खूप विशेष आहे. मी मूळचा हरियाणाचा असून लीगमध्ये पहिल्यांदा हरियाणाविरुद्ध खेळेल. सुरुवातीला मला हरियाणाकडून खेळण्याची इच्छा झाली
- रोहित नाईक । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाचा मोसम खूप विशेष आहे. मी मूळचा हरियाणाचा असून लीगमध्ये पहिल्यांदा हरियाणाविरुद्ध खेळेल. सुरुवातीला मला हरियाणाकडून खेळण्याची इच्छा झाली, परंतु आजपर्यंत मुंबईकरांनी दिलेल्या प्रेमामुळे मला मुंबई सोडून जावेसे वाटत नाही. मुंबईकरांनी दिलेल्या प्रेमामुळे मी स्वत:ला मुंबईकर समजतो, असे कबड्डी स्टार आणि यू मुम्बा संघाचा कर्णधार अनुप
कुमारने ‘लोकमत’शी बोलताना म्हटले.
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाला २८ जुलैपासून सुरुवात होत असून यावेळी ४ नव्या संघांचा स्पर्धेत प्रवेश झाला आहे. त्यात हरियाणाचाही समावेश आहे. याविषयी अनुपला विचारले असता तो म्हणाला की, ‘नक्कीच कर्णधार म्हणून मला हरियाणाकडून खेळण्याची इच्छा झाली. परंतु, शेवटी हा खेळ आहे आणि खेळामध्ये असे होत असते. राष्ट्रीय स्पर्धेत याआधीही मी दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना हरियाणाविरुध्द खेळलो असल्याने हरियाणाविरुद्धचा सामना माझ्यासाठी इतर सामन्यांप्रमाणेच असेल.’
लिलाव प्रक्रियेनंतर बदललेल्या संघाबाबत अनुप म्हणाला की, ‘संघ बदलल्यानंतर सर्वच गोष्टींमध्ये बदल होतात. आत्ताचा संघही चांगला असून प्रशिक्षकांना आमच्या विश्वास आहे. शिवाय आमच्याकडे ६-७ वरिष्ठ खेळाडू असून ते कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळू शकतात.’ त्याचप्रमाणे, ‘यावर्षी आम्ही सराव शिबिर डेहराडून येथे पार पाडले. तिथल्या वातावरणाचा आम्हाला खूप फायदा झाला. कमी आॅक्सिजनमध्ये सराव केल्याने आम्हाला तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देण्यास सोपे गेले,’ असेही अनुपने म्हटले.
यंदाचे सत्र तीन महिने खेळविण्यात येणार असल्याने तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगताना अनुपने म्हटले की, ‘तंदुरुस्ती नसेल तर कोणताच खेळाडू इतका मोठा मोसम खेळू शकणार नाही.
खेळाडू तंदुरुस्त असेल तर तो दुखापतींपासून दूर राहिल. यासाठीच, अनेकांनी वैयक्तिक टे्रनरची नियुक्ती केली आहे. तंदुरुस्ती टिकवण्याचे
मोठे आव्हान प्रत्येक खेळाडूपुढे असेल.’
स्पर्धेतील प्रत्येक संघ नविन असल्याने प्रत्येकापुढे आव्हान असून मुंबईचा संघ समतोल आहे. आम्ही तंदुरुस्ती टिकवण्यावर अधिक भर दिला आहे. शिवाय मुंबईची राखीव फळी नेहमीप्रमाणे मजबूत राखण्यात आम्हाला यश आले असून ही आमची जमेची बाजू आहे.
- ई. भास्करण, प्रशिक्षक
- यू मुम्बा
आम्ही लीगसाठी सज्ज आहोत. डेहराडूनमधील सराव खूप फायदेशीर ठरला. याआधी प्रतिनिधित्त्व केलेल्या दिल्ली संघाच्या तुलनेत मुंबई संघात खूप फरक आहे. स्पर्धेत बहुतेक खेळाडू एकमेकांचा खेळ जाणून असल्याने सामने खूप चुरशीच्या होतील. युवा खेळाडूही चांगले खेळत असल्याने संघाला बळकटी आली आहे.
- काशिलिंग आडके,
आक्रमक
सराव शिबिरात फिटनेसवर अधिक भर देण्यात आल्याने संघातील सर्व खेळाडू फिट आहेत. कर्णधार अनुपचा खूप फायदा होतो. तो सर्वोत्तम कर्णधार आहे. प्रत्येकावर त्याचे बारीक लक्ष असते. ज्याप्रकारे तो सामन्यात शांत असतो, तसाच सरावामध्येही असतो.
- नितिन मदने, आक्रमक.