Tokyo Olympics: एका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 01:17 PM2021-07-31T13:17:24+5:302021-07-31T13:32:37+5:30
Lovelina Borgohain, Tokyo Olympics Live Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंवर देशभरातील लोकांचे लक्ष आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मुलींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंवर देशभरातील लोकांचे लक्ष आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मुलींनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशाच देशाच्या एका मुलीने भारताला बॉक्सिंगमध्ये पदक निश्चित करून दिले आहे. तर दुसरीकडे तिची बहीण सीआरपीएफमधून देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात आहे. टोकियोमध्ये महिलांच्या बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या लवलिना बोरगोहेन (Lovelina Borgohain) हिची बहीण सध्या जोधपूरमध्ये तैनात आहे. तसेच आपल्या बहिणीच्या विजयाचा आनंद व्यक्त करत आहे.
लवलिना हिने उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने तिचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे. दरम्यान, तिच्या विजयानंतर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. तर लवलिना हिच्या बहिणीने जोधपूरमध्ये तिच्या विजयाचा आनंद साजरा केला. लवलिना हिची बहीण लीमा ही सध्या जोधपूरमध्ये जोधपूर एअरपोर्टवर तैनात आहे. आता विमानतळावरील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण बहिणीने पदक जिंकल्यानंतर लीमा हिचे अभिनंदन करत आहेत.
बहिणीने पदक जिंकल्याने लवलीनाची बहीण लीमा खूप आनंदित आहे. ती म्हणाली की, लवलीना हिने पदक जिंकल्याचा मला अभिमान आहे. तिने मेहनत आणि एकाग्रतेच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिने मिळवलेल्या यशाचे श्रेय माझ्या आईला जाते. कारण आईनेच सुरुवातीपासून आम्हा दोन्ही मुलींना शिक्षण आणि खेळामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. दरम्यान, लीमा हिला शुभेच्छा देतानाच सर्वजण लवलिना हिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.