रांची टीम इंडियासाठी लकी

By admin | Published: October 25, 2016 01:40 AM2016-10-25T01:40:03+5:302016-10-25T01:40:03+5:30

कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे गृहमैदान असलेल्या रांचीमध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवले आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान २६ आॅक्टोबर रोजी या मैदानावर

Lucky for Ranchi team India | रांची टीम इंडियासाठी लकी

रांची टीम इंडियासाठी लकी

Next

रांची : कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे गृहमैदान असलेल्या रांचीमध्ये टीम इंडियाने वर्चस्व गाजवले आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान २६ आॅक्टोबर रोजी या मैदानावर चौथा वन-डे सामना खेळला जाणार आहे.
भारताने मोहालीमध्ये रविवारी तिसरा वन-डे सामना सात गडी राखून जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला रांचीमध्ये मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय संघाला अद्याप पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही.
धोनीच्या गृहमैदानावर वन-डेची सुरुवात १९ जानेवारी २०१३ रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने झाली होती. या मैदानावर आतापर्यंत तीन वन-डे व एक टी-२० सामना खेळला गेला आहे. या मैदानावर भारताने इंग्लंड व श्रीलंकेचा वन-डे सामन्यांमध्ये पराभव केला आहे, तर आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीचा निकाल शक्य झाला नाही. भारताने एकमेव टी-२० सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता.
जानेवारी २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन-डे लढतीत भारताने पाहुण्या संघाचा डाव १५५ धावांत गुंडाळल्यानंतर ३ बाद १५७ धावा फटकावित विजय साकारला. विराट कोहलीने त्या लढतीत नाबाद ७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर आॅक्टोबर २०१३ मध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-आॅस्ट्रेलिया सामना रद्द झाला होता. आॅस्ट्रेलियाने २९५ धावा फटकावल्या होत्या आणि लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या डावात ४.१ षटकांनंतर पावसामुळे खेळ शक्य झाला नाही.
धोनीच्या गृहमैदानात रन मशिन विराट कोहलीची कामगिरी शानदार ठरली आहे. या मैदानावरील भारतातर्फे दोन मोठ्या खेळी विराटच्या नावावर आहेत. सध्या
सुरू असलेल्या मालिकेत विराटने धर्मशाला व मोहालीमध्ये मोठी
खेळी केली आहे. भारताने या
दोन्ही लढतीत विजय मिळवला. दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या
लढतीत गृहमैदानावर विराट
लवकर बाद झाला आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)


चौथ्या क्रमांकावर नैसर्गिक फलंदाजी करता येते : धोनी
मोहाली : चौथ्या क्रमांकावर नैसर्गिक फलंदाजी करता येते. तळाच्या क्रमांकावर खेळताना माझी फलंदाजी प्रभावित होत होती, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सहज वाटते. धावा फटकावल्यामुळे मला समाधान वाटत आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून या क्रमांकावर फलंदाजी करण्यास इच्छुक होतो. त्यामुळे छाप सोडण्याची संधी असते. पाचव्या व सहाव्या क्रमांकावर खेळताना हे शक्य नसते. तळाच्या क्रमांकावर खेळताना माझी कामगिरी प्रभावित होत होती. त्यामुळे मी वरच्या क्रमांकावर खेळण्यास उत्सुक होतो. कामगिरीत सुधारणा करण्यासाठी व नैसर्गिक शैलीने फलंदाजी करण्यासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा होती.’’

धोनी गेल्या अनेक वर्षांपासून तळाच्या क्रमांकावर फलंदाजी करीत होता, पण सध्याच्या मालिकेत मनीष पांडेपेक्षा वरच्या स्थानी म्हणजे चौथ्या क्रमांकावर खेळत आहे. धोनीने या लढतीत चौथ्या क्रमांकावर खेळताना ८० धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे. धोनीचे ११ डावांतील हे पहिले अर्धशतक आहे.

धोनीने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले, ‘‘संघव्यवस्थापनासोबत गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा करीत होतो. तळाच्या क्रमांकावर फलंदाजी करताना तुमची जबाबदारी सामना जिंकून देण्याची असते. लक्ष्य गाठण्यासाठी धावा कराव्या लागतात. मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करीत असल्यामुळे अनेक युवा खेळाडूंना तळाच्या स्थानावर फलंदाजी करण्याची संधी मिळत आहे.

‘विराटला बाद केल्यानंतरच जिंकता आले असते’
१विराट कोहलीला बाद केल्यानंतर किंवा मोठी धावसंख्या उभारल्यानंतरच यजमान संघाविरुद्ध विजय मिळवता येतो, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने व्यक्त केली.
२भारताविरुद्ध तिसऱ्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर प्रतिक्रिया देताना विल्यम्सन म्हणाला, ‘‘पराभव स्वीकारणे निराशाजनक आहे. विराटला बाद केल्यानंतरच जिंकणे शक्य असते. विराटला या लढतीत जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याने नाबाद १५४ धावांची खेळी करीत भारताला सहज विजय मिळवून दिला.’’
३विल्यम्सन म्हणाला, ‘‘मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट गमावल्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तळाच्या फलंदाजांनी चांगला खेळ केला. जिम्मी निशाम व मॅट हेन्री यांनी शानदार खेळी केली. एकवेळ आमची ३ बाद १६० अशी मजबूत स्थिती होती.
४मधल्या षटकांमध्ये आमचे फलंदाज झटपट बाद झाले. २८० धावांची मजल मारल्यामुळे समाधानी होतो, पण त्यानंतर आणखी धावांची गरज असल्याचे वाटत होते.

भारतीय संघात बदल नाही
नवी दिल्ली : सुरेश रैना व्हायरलच्या संक्रमणातून सावरण्यात अपयशी ठरल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन वन-डे सामन्यांतून ‘आऊट’ झाला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघात उर्वरित दोन लढतींसाठी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. बीसीसीआयने जाहीर केले, ‘‘अखिल भारतीय सीनिअर निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी १४ सदस्यांचा संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरेश रैना अद्याप व्हायरल संक्रमणातून सावरलेला नाही. त्यामुळे तो मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही.’’

Web Title: Lucky for Ranchi team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.