एम. एस. धोनी भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार
By admin | Published: August 28, 2015 01:05 AM2015-08-28T01:05:19+5:302015-08-28T01:05:19+5:30
महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधार असल्याचे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने व्यक्त केले. एसजेएएनतर्फे (नागपूर क्रीडा पत्रकार संघटना)
नागपूर : महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधार असल्याचे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने व्यक्त केले. एसजेएएनतर्फे (नागपूर क्रीडा पत्रकार संघटना) आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेला श्रीनाथ पत्रकारांसोबत वार्तालाप कार्यक्रमात बोलत होता.
भारतीय क्रिकेटमधील यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या श्रीनाथने धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. श्रीनाथ म्हणाला, ‘‘धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटच्या तीन स्वरूपांमध्ये (कसोटी, वन-डे, टी-२०) यशाचे शिखर गाठले. वन-डे व टी-२० मध्ये विश्वविजेतेपद पटकाविण्या व्यतिरिक्त भारताने कसोटी क्रिकेटमध्येही अव्वल स्थान पटकावले.’’ निर्णायक क्षणी संघाला यश मिळवून देणे यशस्वी कर्णधाराचे गमक असते. त्यात धोनी सर्वांत यशस्वी ठरला आहे. विद्यमान कसोटी कर्णधार कोहलीबाबत हा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, ‘‘विराट आक्रमक कर्णधार आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वत:ची विशेषता असते. त्यामुळे कुणाएका खेळाडूची दुसऱ्या खेळाडूशी तुलना करता येणार नाही. कोहली भारतीय क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधार ठरेल, असा विश्वास आहे. अनुभवाने तो परिपक्व होईल.’’
कसोटी क्रिकेटमध्ये ५ गोलंदाजांच्या रणनीतीचे श्रीनाथने समर्थन केले. श्रीनाथ म्हणाला, ‘‘एक गोलंदाज म्हणून मला असे वाटते, की संघात ५ स्पेशालिस्ट गोलंदाज असणे आवश्यक आहे; पण सर्व काही कर्णधारावर अवलंबून आहे. फलंदाज असलेल्या कर्णधाराची एक अतिरिक्त फलंदाज खेळविण्यास पसंती असते.’’
श्रीनाथ म्हणाला, ‘‘विदेशातील खेळपट्ट्यांवर यश मिळविण्यासाठी तेथील परिस्थितीसोबत जुळवून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यात सर्वच संघांतील खेळाडूंना अडचण भासत असल्याचे दिसून येते.’’ (क्रीडा प्रतिनिधी)