मधुरा वायकरला सुवर्ण तर ऋतूजा सातपुतेला रौप्य
By Admin | Published: November 6, 2016 02:58 AM2016-11-06T02:58:12+5:302016-11-06T02:58:12+5:30
पुणे : अलिगड (उत्तर प्रदेश) येथे शनिवारपासून सुरू झालेल्या २१व्या वरिष्ठ, ज्युनिअर आणि सब-ज्युनिअर रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ...
पुणे : अलिगड (उत्तर प्रदेश) येथे शनिवारपासून सुरू झालेल्या २१व्या वरिष्ठ, ज्युनिअर आणि सब-ज्युनिअर रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ज्युनिअर वैयक्तिक टाईम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राच्या मधुरा वायकरने सुवर्ण तर वरिष्ठ गटात ऋतुजा सातपुतेने रौप्यपदक जिंकले. ज्युनिअर गटात वैष्णवी गबणेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय सायकलिंग महासंघअंतर्गत उत्तर प्रदेश सायकलिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पहाटेचे धुके असताना व थंड वातावरणात सुरु झालेल्या महिलांच्या वरिष्ठ गटाच्या ३० कि.मी. वैयक्तिक टाईम ट्रायल प्रकारात सुरुवातीला महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुतेने ४६ मिनिटे ३७ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. या प्रकारात रेल्वेच्या बिडयालक्ष्मी देवी तौरंगबामने ४६ मिनिटे २४ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. सीएफआयच्या समिरा अब्राहमला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांंच्या ज्युनिअर गटाच्या २० किलो मीटर टाईम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राच्या मधुरा वायकरने सुवर्णपदक, केरळच्या अम्रिता रघुनाथने रौप्य तर महाराष्ट्राच्या वैष्णवी गबणेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी).