राष्ट्रकुलनंतर संघाचा आत्मविश्वास उंचावला- मधुरिका पाटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:31 AM2018-04-20T00:31:20+5:302018-04-20T00:31:20+5:30
मनिका बत्रा हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये मधुरिकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
मुंबई : ‘सिंगापूरसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मिळविलेल्या शानदार विजयामुळे महिला टेबल टेनिस खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला,’ असे मत नुकत्याच गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळविणारी शटलर मधुरिका पाटकर हिने व्यक्त केले.
मनिका बत्रा हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये मधुरिकाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. या शानदार विजयासह आगामी १८ आॅगस्टपासून इंडोनेशिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ चमकदार कामगिरी करेल, असा विश्वासही मधुरिकाने या वेळी व्यक्त केला. मधुरिकाने वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन, जपान, कोरिया, चिनी तैपई, सिंगापूर, हाँगकाँग आणि उत्तर कोरिया यांसारखे बलाढ्य संघ सहभागी होतील. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंगापूरला नमविल्यानंतर आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. आशियाई स्पर्धेतही आम्ही हेच सातत्य कायम राखण्याचा प्रयत्न करू.’
त्याचप्रमाणे, ‘जागतिक क्रमवारीत चौथ्या आणि बाराव्या स्थानी असलेल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या मजबूत संघाविरुद्ध आम्ही विजय मिळविला. यामुळे आम्ही कोणत्याही संघाविरुद्ध बाजी मारू शकतो, असा विश्वास मिळाला,’ असेही मधुरिकाने या वेळी म्हटले.
सिंगापूर एक मजबूत संघ असून, अशा संघाविरुद्ध खेळणे खूप कठीण होते. त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागला.
- मधुरिका पाटकर