गुजरात लायन्सचा शानदार विजय

By admin | Published: May 8, 2017 12:44 AM2017-05-08T00:44:51+5:302017-05-08T00:44:51+5:30

हाशिम आमलाने यंदाच्या मोसमातील दुसरे वैयक्तिक शतक झळकावल्यानंतरही किंग्ज इलेव्हन पंजाबला गुजरात लायन्सविरुध्द

The magnificent victory of the Gujarat Lions | गुजरात लायन्सचा शानदार विजय

गुजरात लायन्सचा शानदार विजय

Next

मोहाली : हाशिम आमलाने यंदाच्या मोसमातील दुसरे वैयक्तिक शतक झळकावल्यानंतरही किंग्ज इलेव्हन पंजाबला गुजरात लायन्सविरुध्द ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. आमलाच्या जोरावर पंजाबने ३ बाद १८९ धावांची आव्हानात्मक मजल मारल्यानंतर गुजरातने ड्वेन स्मिथच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर १९.४ षटकात ४ बाद १९२ धावा काढून बाजी मारली. यासह पंजाबच्या प्ले आॅफ गाठण्याच्या मोहिमेला धक्का बसला असून आता त्यांना त्यांच्या उर्वरीत प्रत्येक सामन्यात विजय आवश्यक आहे.
ड्वेन स्मिथ - इशान किशन यांनी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला ९१ धावांची मजबूत सलामी देत विजयाचा पाया रचला. टी. नटराजनने किशनला (२९) बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर, स्मिथही परतला. परंतु, त्याने ३९ चेंडूत ८ चौकार व ४ षटकार खेचत ७४ धावांचा तडाखा दिला. त्याचबरोबर कर्णधार सुरेश रैना (३९), दिनेश कार्तिक (नाबाद ३५) यांनी मोक्याच्यावेळी फटकेबाजी करत गुजरातचा विजय सुकर केला. अखेरच्या षटकात ८ धावांची आवश्यकता असताना रवींद्र जडेजा व कार्तिक यांनी संघाच्या विजयावर शिक्का मारला.
तत्पूर्वी, पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर हाशिम आमला आणि शॉन मार्श यांच्या दमदार फलंदाजीच्या पंजाबने गुजरातविरुध्द आव्हानात्मक मजल मारली. दुर्दैवाने पुन्हा एकदा आमलाचा हमला व्यर्थ गेला. याआधी आमलाने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावल्यानंतरही पंजाबला पराभूत व्हावे लागले होते. आमलाने ६० चेंडूत ८ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी कारताना १०४ धावांची जबरदस्त खेळी केली. शॉन मार्शने ४३ चेंडूत ६ चौकारांसह ५८ धावा काढल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. परंतु, गुजरातच्या सांघिक खेळापुढे या दोघांची झुंज अपयशी ठरली. (वृत्तसंस्था)

Web Title: The magnificent victory of the Gujarat Lions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.