गुजरातचा कोलकातावर दिमाखदार विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2016 11:55 PM2016-05-08T23:55:01+5:302016-05-08T23:55:01+5:30
गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर दिनेश कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्सने आयपीएलमधील सातवा विजय मिळवताना बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला ५ गडी राखून नमवले.
कोलकाता : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर दिनेश कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्सने आयपीएलमधील सातवा विजय मिळवताना बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला ५ गडी राखून नमवले. कोलकाताने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना गुजरातने १८ षटकांतच बाजी मारली. यासह गुजरातने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली.
इडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गुजरातने कोलकाताला ४ बाद १५८ धावांवर रोखण्यात यश मिळवले. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने सहज बाजी मारली. ड्वेन स्मिथ (२७) आणि ब्रेंडन मॅक्युलम (२९) यांनी सावध सुरुवात केल्यानंतर कर्णधार सुरेश रैना (१४) व दिनेश कार्तिक (५१) यांनी ४९ धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेलने रैनाला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर अॅरॉन फिंच व कार्तिक यांनी संघाचा विजय निश्चित केला. कार्तिकने विजयी अर्धशतक झळकावताना २९ चेंडंूत ८ चौकार व एका षटकारासह ५१ धावा काढल्या, तर फिंच १० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २९ धावा काढून परतला.
तत्पूर्वी, प्रमुख फलंदाज झटपट परतल्यानंतर शाकिब-अल-हसन (नाबाद ६६) आणि युसुफ पठाण (नाबाद ६३) यांनी केलेल्या नाबाद १३४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर कोलकाताने समाधानकारक मजल मारली. प्रवीण कुमारने भेदक मारा करीत कोलकाताला जबर धक्के दिले. रॉबिन उथप्पा (१४), कर्णधार गौतम गंभीर (५), मनीष पांडे (०) व सूर्यकुमार यादव (४) स्वस्तात परतल्याने कोलकाताची ४ बाद २४ अशी केविलवाणी अवस्था झाली. मात्र शाकिब व पठाण यांनी यानंतर गुजरातला आणखी यश मिळू दिले नाही. शाकिबने ४९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ६६ धावा फटकावल्या. पठाणने ४१ चेंडूंत ७ चौकार व एका उत्तुंग षटकारासह ६३ धावा चोपल्या.
संक्षिप्त धावफलक :
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ४ बाद १५८, शाकिब-अल-हसन नाबाद ६६, युसुफ पठाण नाबाद ६३, प्रवीण कुमार २/१९ पराभूत वि. गुजरात लायन्स : १८ षटकांत ५ बाद १६४, दिनेश कार्तिक ५१, अॅरॉन फिंच २९, ब्रेंडन मॅक्युलम २९; ब्रॅड हॉग १/१९, आंद्रे रसेल १/२१.