औरंगाबाद महामॅरेथॉनला ‘महाप्रतिसाद’, हजारोंच्या संख्येने खेळाडूंचा सहभाग : सेलिब्रिटींनी वाढविला उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:24 AM2017-12-18T00:24:21+5:302017-12-18T00:26:20+5:30
औरंगाबादकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी (दि. १७) ‘लोकमत’ने आयोजिलेल्या दुसºया महामॅरेथॉन स्पर्धेलाही शहरवासीयांसोबत देश-विदेशातील धावपटूंचा ‘महाप्रतिसाद’ लाभला आणि ‘लोकमतसमूहा’वर लोकांच्या असलेल्या निस्सीम प्रेमावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. लोकमतच्या पुढाकाराने होत असलेल्या सॅफ्रॉन लँडमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये २१ देशांतील आणि विविध राज्यांतील ३० हून अधिक शहरांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच आबालवृद्धांनी सहभाग घेऊन ‘हम भी किसे सें कम नहीं’ हे दाखूवन दिले.
औरंगाबाद : औरंगाबादकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या जोरावर रविवारी (दि. १७) ‘लोकमत’ने आयोजिलेल्या दुसºया महामॅरेथॉन स्पर्धेलाही शहरवासीयांसोबत देश-विदेशातील धावपटूंचा ‘महाप्रतिसाद’ लाभला आणि ‘लोकमतसमूहा’वर लोकांच्या असलेल्या निस्सीम प्रेमावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. लोकमतच्या पुढाकाराने होत असलेल्या सॅफ्रॉन लँडमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये २१ देशांतील आणि विविध राज्यांतील ३० हून अधिक शहरांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच आबालवृद्धांनी सहभाग घेऊन ‘हम भी किसे सें कम नहीं’ हे दाखूवन दिले.
‘शहर धावले माझ्यासाठी आणि मी धावलो शहरासाठी’ या जनभावनेचा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभव या महामॅरेथॉनमध्ये पाहायला मिळाला. वर्षभरापासून प्रतीक्षा लागलेल्या उत्कंठावर्धक दुसºया पर्वामध्ये नागरिकांचा उत्साहदेखील द्विगुणित होता. खेळाडूंनी रविवारी पहाटे-पहाटेच गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर जमण्यास सुरुवात केली. मॅरेथॉनमध्ये धावण्याची ऊर्मी एवढी, की पहाटेच्या थंडीचाही त्यांच्यावर काही परिणाम जाणवत नव्हता.
‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, ‘सखी मंच’च्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, महापौर नंदकुमार घोडेले, ब्रिगेडियर डी. के. पात्रा, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले, उपायुक्त वर्षा ठाकूर, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते, नागरी संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त सी. डी. शेवगण, सहायक आयुक्त एस. एच. भापकर, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे आणि ज्ञानेश्वर कांबळे, घाटीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे उपअधीक्षक शिवाकांत बाजपेयी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत २१ किलोमीटर गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवून सकाळी ६ वाजता महामॅरेथॉनला सुरुवात झाली.
‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा यांनी खेळाडूंमध्ये जाऊन त्यांचा उत्साह वाढविला. २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि ३ किमी आणि वेटरन वॉक अशा विविध गटांत पार पडलेल्या या स्पर्धेतून खेळाडूंनी बंधुभाव, एकता आणि आरोग्याचा संदेश देत दौड लगावली. मुंबई-पुणे येथील मॅरेथॉन स्पर्धांच्या तोडीस तोड आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, प्रभावी सुनियोजन, प्रशासकीय अधिकारी, नोकरदारवर्ग ते सामान्य लोकांपर्यंत सर्वच स्तरांतील लोकांचा सहभाग, मनोरंजनाचा तडका आणि ‘औरंगाबाद स्पिरिट’ची दुप्पट मात्रा आदी वैशिष्ट्यांमुळे यंदाची महामॅरेथॉन अनेक बाबतीत संस्मरणीय ठरली.
१० किमी गटाच्या स्पर्धेला सकाळी ६.१५ वाजता, ५ किमी गटाच्या स्पर्धेला सकाळी ७ वाजता, ३ किमी गटाच्या स्पर्धेला ७.१० वाजता, तर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या ‘वेटरन रन’ स्पर्धेला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रत्येक गटाच्या खेळाडूंचा उत्साह आणि जोम ओसंडून वाहत होता. खासकरून ३ किमी गटाच्या फॅमिली रनमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत धावण्याची मौज काही औरच होती. नातवंडांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वच वयोगटातील सदस्य सहभागी झाल्याने स्पर्धेला कौटुंबिक उत्सवाचे स्वरूप आले होते. मॅरेथॉन मार्गावर शाळकरी विद्यार्थ्यांचे लेझीम, ढोल-ताशा पथक, तरुणांचे रॉक बँडस् आणि उत्साहप्रेमी नागरिकांनी फुले टाकून, टाळ्या वाजवून आणि रांगोळी काढून धावपटूंचे मनोबल वाढविले.
खुल्या गटात किशोर, प्राजक्ता ठरले अव्वल
पुरुषांच्या २१ किमी खुल्या गटात किशोर जाधव याने वर्चस्व राखले. किशोरने २१ किमीची अर्धमॅरेथॉन १ तास १७ मिनिटे सहा सेकंदात जिंकली. गतवर्षी लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनमध्ये विजेतेपद पटकावणाºया गजानन ढोले याला या वेळेस मात्र दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. गजानन ढोले २१ किमी अंतर १ तास १८ मिनिटे व ३६ सेकंदात पूर्ण केले.
विठ्ठल आटोळे हा तिसºया स्थानी आला. महिलांच्या खुल्या गटात नागपूरच्या प्राजक्ता गोडबोले हिने प्रारंभापासूनच आघाडी घेताना अव्वल स्थान मिळवले. तिने २१ किमी अंतर १ तास २२ मिनिटे व ५५ सेकंदात पूर्ण केले. पूजा राठोडने दुसरा क्रमांक, तर भारती दुधे हिने तिसरे स्थान मिळवले.
देश-विदेशातील धावपटू झाले सहभागी-
लोकमत महामॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटूंनी सहभाग नोंदवत बक्षिसांची लयलूट केली. केनियाची धावपटू ब्रिगीड किमितवार हिने विदेशी गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर अमेरिकेच्या लॉरेन्सस नेक यांच्यासह इंग्लंड, चीन, केनिया, भूतान, मलेशिया आदी देशांतील खेळाडूंनीही मॅरेथॉनमध्ये आपले कौशल्य दाखवले.
यासह देशातील भोपाळ, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, अहमदाबाद आदी शहरांतील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले, तर राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सातारा, अकोला, लातूर, परभणी, नांदेड, उदगीर, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी शहरांसह ग्रामीण भागातील धावपटू सहभागी झाले होते. महामॅरेथॉनमधील बहुतांश बक्षिसे ही राज्यातील विविध शहरांतून आलेल्या धावपटूंनीच पटकावली आहेत.
सांगलीचा भागेशच ठरला वेगवान धावपटू
डिफेन्स गटात खेळणारा मूळचा सांगलीचा भागेश पाटीलच खºया अर्थाने वेगवान धावपटू ठरला. त्याने २१ किमी अंतर १ तास ८ मिनिटे आणि ३७ सेकंदात पूर्ण करताना डिफेन्स गटात अव्वल स्थान पटकावले. डिफेन्सच्या महिला गटात अश्विनी देवरे हिने १ तास ५६ मिनिटे ५७ सेकंद वेळ नोंदवताना अवल स्थान राखले. २१ किमी ज्येष्ठांच्या पुरुष गटात कैलास माने अव्वल स्थानी राहिले. त्यांनी १ तास ३२ मिनिटे व ४३ सेकंद वेळ नोंदवला. लक्ष्मण शिंदेने दुसरे स्थान मिळवले, तर राजेश साहूने तिसरा क्रमांक मिळवला. ज्येष्ठ महिलांच्या गटात शोभा देसाई अव्वल ठरल्या. त्यांनी १ तास ४६ मि. ७ सेकंदात २१ किमी अंतर पूर्ण केले. माधुरी निमजे दुसºया, तर शोभा पाटील तिसºया स्थानी राहिल्या.