महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:22 AM2020-01-14T10:22:03+5:302020-01-14T10:22:35+5:30
सोमवारी हरियाणा येथे आशिआई अजिंक्यपद स्पर्धेसाठीची निवड चाचणी घेण्यात आली.
जागतिक कुस्ती स्पर्धेत विक्रमी कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सोमवारी हरियाणा येथे आशिआई अजिंक्यपद स्पर्धेसाठीची निवड चाचणी घेण्यात आली. त्यात राहुलनं 61 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. दिल्ली येथे 18 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
राहुलने पहिल्या सामन्यात दिल्लीच्या नवीन कुमारला पराभूत केले, तर अंतिम कुस्तीत हरियाणाच्या रविंद्रला 7-5 असे नमवून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक व जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने राहुलला प्रथम वर्ग दर्जा अधिकारी पदी नियुक्त करत पोलिस उपअधीक्षक पदी थेट बढती दिली.
राहुलने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याने 61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला. राहुलने 2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. 'लोकमत'ने त्याला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले होते.
अन्य गटातील खेळाडू
- फ्री स्टाईल - राहुल आवारे ( 61 किलो), नवीन ( 70 किलो), गौरव बलियान ( 79 किलो), सोमवीर ( 92 किलो)
- ग्रीको रोमन - अर्जुन ( 55 किलो), सचिन राणा ( 63 किलो), आदित्य कुंडू ( 72 किलो), हरप्रीत सिंग ( 82 किलो)
- महिला गट - पिंकी ( 55 किलो), सरिता ( 59 किलो), साक्षी मलिक ( 65 किलो), गुरशरणप्रीत कौर ( 72 किलो)