महाराष्ट्र कॅरम : विकास धारिया आणि आयेशा साजिद यांना विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 08:31 PM2020-02-24T20:31:49+5:302020-02-24T20:32:17+5:30
अंतिम फेरीत मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारियाने रंगतदार तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत चौथा मानांकित पुण्याच्या अभिजित त्रिफणकरचा २५-६, १३-२५, २५-४ असा पराभव केला.
शिवाजी पार्क जिमखान्याने आयोजित केलेल्या बाराव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या पुरुष ऐकरी व महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारिया, दुसरी मानांकित माजी सार्क व राज्य विजेती आयेशा साजिद यांनी विजेतेपद पटकाविले.
अंतिम फेरीत मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारियाने रंगतदार तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत चौथा मानांकित पुण्याच्या अभिजित त्रिफणकरचा २५-६, १३-२५, २५-४ असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाचा मानकरी ठरला व रोख रु. २५,०००/- चे बक्षिस व चषक पटकाविला. उपविजेता अभिजित त्रिफणकरला रोख रु. १२,५००/- व चषक देऊन गौरविण्यात आले. पहिल्या गेममध्ये अप्रतिम शॉटस् व आक्रमक खेळ करत मुंबईच्या विकास धारियाने सातव्या बोर्डपर्यंत २०-६ अशी आघाडी घेत आठव्या बोर्डमध्ये ५ गुण मिळवून २५-६ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चौथा मानांकित अभिजित त्रिफणकरने शांतचित्ताने आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत सहाव्या बोर्डपर्यंत १६-११ अशी आघाडी घेत नंतरच्या बोर्डमध्ये ९ गुण मिळवून २५-११ असा दुसरा गेम जिंकून १-१ ने बरोबरी केली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये आत्मविश्वास उंचावलेल्या विकास धारियाने ६ व्या बोर्डपर्यंत २०-४ गुणांनी आघाडी घेतली. नंतरच्या सातव्या बोर्डमध्ये त्याच्या ब्रेकमध्ये कटशॉटस्चे प्रात्यक्षिक घडवित ५ गुणांचा बोर्ड मिळवून २५-४ असा जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या योगश डोंगडेने तीन गेम रगंलेल्या लढतीत मुंबईच्याच माजी राज्य विजेता पंकज पवारला २५-६, ११-२५, २५-१८ अशी मात करून रुपये ८,०००/-, चषक व प्रमाणपत्र पटकाविले.
तत्पूर्वी झालेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याच्या अभिजित त्रिफणकरने सरळ दोन गेममध्ये मुंबईच्या पंकज पवारचा २५-३, २५-१२ असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या विकास धारियाने अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत मुंबईच्याच माजी राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेचा २५-११, २५-८ असे दोन गेममध्ये निष्प्रभ करून अंतिम फेरी गाठली.
महिला एकेरीमध्ये दुसरी मानांकित मुंबईच्या माजी सार्क व राज्य विजेती आयेशा साजिदने सरळ दोन गेममध्ये मुंबईच्या मिताली पिंपळेचा २५-९, २५-० असा फाडशा पाडत आमचे वर्चस्व सिद्ध करून विजेतेपदावर आपले नाव कोरले व रोख रु. ८,०००/- चषक व प्रमाणपत्र याची मानकरी ठरली. उपविजेती मिताली पिंपळेला रु. ६,०००/-, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या मैत्रेयी गोगटेने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत ठाण्याच्या चैताली सुवारेचा २५-१६, २५-५ अशी झुंज मोडीत काढून रु. ४,०००/-, चषक व प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या आयेशा साजिदने मुबंईच्या मैत्रेयी गोगटेचे आव्हान तीन गेम रंगलेल्या लढतीत २१-२५, २५-११, २५-० अशी मात करत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या मिताली पिंपळेने बिनमानांकित ठाण्याच्या चैताली सुवारेचा सरळ दोन गेम रंगलेल्या एकतर्फी लढतीत २५-३, २५-१४ असे नमवून अंतीम फेरी गाठली.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण १३ ब्रेक टू फिनिश आणि ५ ब्लॅक टू फिनिश नोंदविले. या स्पर्धेमध्ये एकाच वेळी ४० आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरको कॅरम बोर्डस्, जेरीचे स्टँड व सिसका कॅरम सोंगट्या वापरण्यात आल्या.