महाराष्ट्राला दुहेरी विजयाची संधी
By Admin | Published: June 13, 2016 04:23 AM2016-06-13T04:23:02+5:302016-06-13T04:23:02+5:30
बलाढ्य महाराष्ट्र संघाने केरळचा २१-१२ असा पराभव करत २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेची अंतिम फेरी निश्चित केली.
मुंबई : मध्यांतराला बरोबरी राहिल्यानंतर बलाढ्य महाराष्ट्र संघाने केरळचा २१-१२ असा पराभव करत २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेची अंतिम फेरी निश्चित केली. तर महिलांच्या गटातही केरळला ११-७ असे १ डाव व ४ गुणांनी लोळवून महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठताना दुहेरी विजेतेपदाची संधी निर्माण केली.
भुवनेश्वरला सुरु असलेल्या स्पर्धेच्या पुरुष गटात महाराष्ट्र व केरळ यांच्यात अटीतटीची लढत झाली. दोन्ही संघांनी केलेल्या दमदार खेळामुळे मध्यांतरापर्यंत सामना ८-८ असा बरोबरीत राहिला. दुसऱ्या डावात मात्र महाराष्ट्राने जोरदार आक्रमण करत केरळचे १३ गडी टिपून भक्कम आघाडी मिळवली. महाराष्ट्राच्या संरक्षणात दिपक माने (३.१०मिनिटे) व कर्णधार महेश शिंदे (२.१० व १.३० मिनिटे ) यांनी चमकदार खेळ केला. मध्यांतरानंतर मारलेल्या मुसंडीमुळे महाराष्ट्राने केरळचा २१-१२ असा धुव्वा उडवला.
महिला गटातही केरळला महाराष्ट्राकडून पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राच्या ऐश्वर्या सावंतने पहिल्या डावात तर
कविता घाणेकरने दुसऱ्या डावात प्रत्येकी ३.५० मिनिटे संरक्षण
केले. त्यांना पोर्णिमा सकपाळेने चांगली साथ दिली. शिवाय आक्रमणातही पोर्णिमाने ३ गडी बाद करुन अष्टपैलू खेळ केला. उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने केरळचा ११-७ असा १ डाव व
४ गुणांनी नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)
>किशोर - किशोरी चमकले
२७ व्या सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघांनी आपला दबदबा सिध्द करताना अनुक्रमे कर्नाटक व दिल्लीचा पाडाव करत अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या किशोर संघाने राहूल जाधवच्या (४.१०व २ मिनिटे) जोरावर कर्नाटकचा ९-५ असा १ डाव ४ गुणांनी फडशा पाडला. तर किशोरी संघाने दिल्लीचा ११-४ असा १ डाव व ७ गुणांनी धुव्वा उडवला. पुरुष व महिला संघाच्या अंतिम फेरीनंतर महाराष्ट्राला विजेतेपदासाठी किशोर गटात झारखंड विरुद्ध तर किशोरी गटात कर्नाटकविरुद्ध भिडावे लागेल.