महाराष्ट्र हॉकी असोसिएशनतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनी मुंबईच्या 'कोरोना वॉरियर्स'चा सत्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:01 PM2020-09-01T15:01:30+5:302020-09-01T15:01:52+5:30
महाराष्ट्र हॉकी असोसिएशनतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनी मुंबईतील 'कोरोना वॉरियर्स' आणि माजी हॉकीपटूंचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र हॉकी असोसिएशनतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनी मुंबईतील 'कोरोना वॉरियर्स' आणि माजी हॉकीपटूंचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सहाय्यक पोलीस अधिकारी वाहिद पठाण आणि रेल्वे पोलीस अधिकारी प्रकाश सकपाळ यांना गौरविण्यात आले. या दोन्ही माजी खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राचे नाव गाजवले. मराहाराष्ट्रातील हॉकी खेळातील त्यांच्या योगदानाला महाराष्ट्र हॉकी असोसिएशनकडून गौरवण्यात आले. कोरोना व्हायरसच्या संकटात पठाण आणि सकपाळ 'कोरोना वॉरियर्स'ची जबाबदारीही पार पाडत आहेत.
मेजर ध्यानचंद यांच्या 135व्या जयंती निमित्त महाराष्ट्र हॉकी असोसिएशन आणि राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागातर्फे या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्याहस्ते माजी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कोरोना संकटात झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे माजी खेळाडूंनी आभार मानले, पठाण हे अंधेरी क्राईम ब्रांच सहाय्यक पोलीस अधिकारी आहेत आणि कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत सामान्य माणसांना सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत.
''खेळाडू असल्याचा फायदा या कोरोना काळात झाला. कोरोना व्हायरसच्या काळात मानसिक कणखरता अधिक महत्त्वाची आहे आणि खेळाडू असल्याचा फायदा झाला,''असे पठाण यांनी सांगितले. स्वतःसह इतर सहकाऱ्यांच्याही मानसिक कणखरतेची काळजी पठाण घेत आहेत. ''संपूर्ण टीमचे मनोबल खचू नये यासाठी सहकाऱ्यांना सातत्यानं प्रेरणा देण्याचं काम करत होतो. हे संकटच असं आहे की, येथे स्वतःच्या सुरक्षिततेसोबतच सहकाऱ्यांची व सामान्यांची सुरक्षितता याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे स्वतःला शारिरीक आणि मानसिक तंदुरूस्त ठेवण्याचे काम तर मी करतच होतो. शिवाय सहकाऱ्यांचेही मनोबल खचू द्यायचे नाही,याचीही काळजी घेत होतो,''असे ते म्हणाले.
सकपाळ यांनी सांगितले की,''हे संकट कोणालाच अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मानसिक कणखरता हेच यावर मात करण्यासाठीचा उपाय आहे. खेळाची पार्श्वभूमी असल्यामुळे मला ते सहज जमलं. पण, याच काळात काही नातेवाईक व सहाकाऱ्यांना कोरोना झाला होता. त्यांना मानसिक धीर दिले आणि त्यांनी कोरोनावर मात केली.''