महाराष्ट्र आयर्नमॅनने इतिहास रचला; प्रीमिअर हँडबॉल लीगचा चषक उंचावला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:44 AM2023-06-26T10:44:45+5:302023-06-26T10:45:06+5:30

Premier Handball League पहिल्या PHL फायनलमध्ये गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेशवर ३८-२४ असा दणदणीत विजय

Maharashtra Ironmen Crowned Champions of the first-ever Premier Handball League season | महाराष्ट्र आयर्नमॅनने इतिहास रचला; प्रीमिअर हँडबॉल लीगचा चषक उंचावला!

महाराष्ट्र आयर्नमॅनने इतिहास रचला; प्रीमिअर हँडबॉल लीगचा चषक उंचावला!

googlenewsNext

जयपूर, २५ जून २०२३ : महाराष्ट्र आयर्नमॅनने इतिहास घडविताना प्रीमिअर हँडबॉल लीगच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद पटकावले. येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने ३८-२४ अशा फरकाने गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेश संघावर विजय मिळवला. कर्णधार इगोर चिसेलिओव्ह, जलाल कियानी, मनजित यांच्यासह गोलरक्षक नवीन देश्वाल याने अप्रतिम कामगिरी करताना महाराष्ट्र आयर्नमॅनला हा विजय मिळवून दिला.  

इगोर चिसेलिओव्हने पहिल्याच मिनिटाला आयर्नमॅनला आघाडी मिळवून दिली. गोल्डन ईगल्सकडूनही प्रतिउत्तर मिळाले, पण चिसेलिओव्हच्या मदतीला अंकित आला. आयर्नमॅनचा गोलरक्षक नवीन देश्वालनेही चांगला बचाव केला. जलाल कियानीने पेनल्टीवर गोल करताना महाराष्ट्र आयर्नमनला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. गोल्डन ईगल्सचा गोलरक्षक ओमिद रेझाचा बचावही अप्रतिम दिसला आणि त्याने पहिल्या ११ मिनिटांत ५ बचाव केले. १४व्या मिनिटाला महाराष्ट्राच्या शुभम शर्माला दोन मिनिटांसाठी निलंबित केले गेले. पुढच्याच मिनिटाला मनजितलाही दोन मिनिटांसाठी मैदानाबाहेर केले गेले आणि गोल्डन ईगल्ससाठी आयती संधी चालून आली. पण, गोल करून पहिल्या १५ मिनिटांत आयर्नमॅनने ८-५ अशी आघाडी घेतली. 

मनजित आणि जलाल यांना वन ऑन वन परिस्थितीतही रेझाने गोल करू दिले नाही.  पण, त्याने आयर्नमॅनच्या खेळाडूंचे आक्रमण कमी झाले नाही. चिसेलिओव्ह, जलाल, मनजित यांनी दमदार खेळ करताना आयर्नमॅनची आघाडी ५ गोल्सच्या फरकाने वाढवली. चिसेलिओव्हन आणि जलाल या दोघांनीही पहिल्या हाफमध्ये गोल्सची हॅटट्रिक साजरी केली. पहिल्या हाफच्या अखेरच्या ५ मिनिटांत आयर्नमॅनच्या बचावातली उणीव गोल्डन ईगल्सने हेरली अन् पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या हाफमध्ये आयर्नमॅनने गोल करण्याच्या ४-५ सोप्या संधी गमावल्याने त्यांना १६-१२ अशा आघाडीवर समाधान मानावे लागले.  

दुसऱ्या हाफमध्ये गोल्डन ईगल्सने गोल करण्याच्या दोन सोप्या संधी गमावल्याने आयर्नमॅनची ४ गुणांची आघाडी कायम राहिलेली. आयर्नमॅनचा बचाव सुरेख होताना दिसला, परंतु गोल्डन ईगल्सने त्याला तोडगा म्हणून उजव्या-डाव्या बाजूने आक्रमण सुरू केले. त्यात गोलरक्षक रेझाच्या अविश्वसनीय बचावाने आयर्नमॅनवरील दडपण वाढवले होते. तरीही आयर्नमॅनने १९-१४ अशी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या हाफच्या ८व्या मिनिटाला गोलरक्षक देश्वालने त्याच्या गोलपोस्टवरून समोरच्या गोलपोस्टवर गोल केला, त्यात पुढच्याच मिनिटाला जलालने पेनल्टीवर गोल करून संघाला २२-१५ अशी आघाडी मिळवून दिली. 

आयर्नमॅनकडून सातत्याने आक्रमण होताना पाहून गोल्डन ईगल्सच्या बचावात ढिसाळपणा दिसला. त्याचाच फायदा उचलताना आयर्नमॅनने २८-१६ अशी भक्कम आघाडी घेतली. इथून गोल्डन ईगल्सचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला अन् आयर्नमॅनने अगदी सहजतेनं गोलसपाटा लावला. गोल्डन ईगल्सच्या सुखवीर सिंग ब्रारने यंदाच्या पर्वात १०० गोल्स करण्याचा पराक्रम केला आणि अशी कामगिरी करणारा तो प्रीमिअर हँडबॉल लीगमधील पहिला खेळाडू ठरला. पण, आयर्नमॅनने ३८-२४ असा दणदणीत विजय मिळवून जेतेपदावर नाव कोरले. 

इगोर चिसेलिओव्ह आणि जलाल कियानी यांनी महाराष्ट्र आयर्नमॅनकडून सर्वाधिक ११ गोल्स केले. चिसेलिओव्हला या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले गेले.  

अंतिम गुण - महाराष्ट्र आयर्नमॅन ३८ वि. वि. गोल्डन ईगल्स उत्तर प्रदेश २४
 

Web Title: Maharashtra Ironmen Crowned Champions of the first-ever Premier Handball League season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.