महाराष्ट्र केसरी 2020: समस्येला संधीमध्ये परावर्तित करून सागर मारकडचा गोल्डन ‘पंच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 04:17 PM2020-01-05T16:17:30+5:302020-01-05T16:18:51+5:30
राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याचा निर्धार...
- अमोल मचाले
पुणे : खेळामध्ये दुखापत ही न टाळता येणारी गोष्ट. यामुळे गुणवान खेळाडूंना चांगल्या संधींना मुकावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही खेळाडू मात्र जिद्दीच्या जोरावर दुखापत नावाच्या समस्येवर मात करून यशाची नवी शिखरे पादाक्र्रांत करतात. असाच कौतुकास्पद पराक्रम केलाय तो पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या सागर मारकड या मल्लाने. सुमारे एका वर्षापूर्वी झालेल्या खांद्याच्या दुखापतीच्या समस्येला संधीमध्ये परावर्तित करून त्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग पाचवे सुवर्णपदक पटकाविण्याचा पराक्रम केला आहे.
सागर हा पूर्वी माती विभागातून ५७ किलो वजन गटामध्ये खेळायचा. मात्र, मागील वर्षी डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्यासमोर समस्या उभी राहिली. कारण दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला काही काळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. मैदानाबाहेर राहण्याची वेळ आल्याने सागरचे वजन ६३ किलोपर्यंत वाढले होते. ५७ किलो वजन गटात सलग ४ वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या सागरसमोर यामुळे नवे आव्हान उभे राहिले. स्पर्धेच्या तयारीसाठी त्याच्याकडे वेळ कमी होता.
५७ किलो वजन गटामध्ये खेळण्यासाठी उपलब्ध कालावधीत ६ किलो वजन कमी करणे नव्या संकटांना निमंत्रण ठरू शकले असते. मात्र, सागर डगमगला नाही. त्याने ६१ किलो वजन गटामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आणि जिद्दीने तयारीला लागला. नव्याने जास्त वजनाच्या गटात खेळणे हे कोणत्याही मल्लासाठी आव्हानात्मक असते. कारण वाढीव वजन गटातील खेळाडू जादा ताकदवान असतात. त्यांच्यासमोर टिकाव लागणे अवघड असते. तरीही २ किलो वजन कमी करून हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेरताना २३ वर्षीय सागरने ६१ किलो वजन गटात सर्वोच्च यश मिळवले.
आपल्या या यशाबाबत ‘लोकमत’सोबत संवाद साधताना सागर म्हणाला, ‘‘नेहमी ५७ किलो वजन गटात खेळल्याने ६१ किलो वजन गटात खेळणे सोपे ठरणार नव्हते. मात्र, प्रशिक्षक असलेल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत केल्याने मी हे यश मिळवू शकलो. या पुढील काळात ५७ किलो वजन गटातून आॅलिम्पिकमध्ये खेळण्याचे माझे ध्येय आहे.’ सागरचे वडील मारूती मारकड हे वायूसेनेतून निवृत्त झाले असून ते इंदापूर येथे कुस्ती केंद्र चालवितात.
नवीन वजन गटात खेळण्यासाठी गेले वर्षभर तयारी करीत होतो. त्यामुळे पदक जिंकू असा विश्वास होता पण अंतिम फेरीत इतक्या सहजासहजी विजय मिळेल असे वाटले नव्हते. यशाचे श्रेय मी एनआयए प्रशिक्षक असलेले वडील मारुती मारकड यांना देतो. यापुढे मला राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करायची आहे,'' असे सागर मारकडने सांगितले.