महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत आज; शिवराज राक्षे अन् पृथ्वीराज मोहोळ मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 05:52 AM2023-11-20T05:52:05+5:302023-11-20T06:06:37+5:30
अमरावतीच्या तानाजी झुंझुरकेने छत्रपती संभाजी नगरच्या आतिक कादरीवर चितपट करीत विजय मिळविला.
महेश पाळणे
धाराशिव : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील लढती जसजशा पुढे जात आहेत तसतशी चुरस वाढत असल्याचे चित्र आहे. गादी गटातून नांदेडच्या शिवराज राक्षे व मुंबईच्या पृथ्वीराज मोहोळने अंंतिम फेरी गाठली आहे. माती विभागातून हिंगोलीचा गणेश जगताप आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांनी अंतिम फेरीत धडक दिली. सोमवारी दोन्ही गटांच्या अंतिम लढती रंगणार आहेत.
गादी विभागातील उपांत्य सामन्यात नांदेडच्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने कोल्हापूरच्या संग्राम पाटीलचा एकतर्फी धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या पृथ्वीराज मोहोळने पुण्याच्या हर्षद कोकाटेचा ५-० असा एकेरी पराभव करीत फायनलची जागा पक्की केली आहे. तत्पूर्वी, माती विभागात नांदेडच्या शिवराज राक्षेने मुंबईच्या सारंग सोनटक्केचा १०-० असा एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरच्या संग्राम पाटीलने बुलढाण्याच्या बाला रफीक शेखचा ११-६ असा धुव्वा उडविला. पुण्याच्या हर्षद कोकाटेने मुंबईच्या वैभव रासकरला चितपट करीत विजय मिळविला. मुंबईच्या पृथ्वीराज मोहोळने पुण्याच्या तुषार दुबेचा ७-० असा सरळ पराभव केला. माती विभागात हिंगोलीच्या गणेश जगतापने कोल्हापूरच्या श्रीमंत भोसलेचा ६-० ने एकतर्फी पराभव केला.
अमरावतीच्या तानाजी झुंझुरकेने छत्रपती संभाजी नगरच्या आतिक कादरीवर चितपट करीत विजय मिळविला. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने पुण्याच्या साकेत यादवचा चितपट करीत धुव्वा उडविला.
सदगीर-जगताप मातीतून फायनलमध्ये
हिंगोलीच्या गणेश जगतापने अवघ्या एका मिनिटात लपेट डावावर अमरावतीच्या तानाजी झुंझुरकेला उपांत्य फेरीत चितपट करीत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या सामन्यात नाशिकच्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ६-१ असा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये हर्षवर्धनने एकेरी पट काढून महेंद्रला बाहेर काढत एक गुणाची कमाई केली. त्यानंतर खेमे धरून पाठीवर घेत २ गुण कमावले. ६-१ असा स्कोअर होताच महेंद्र गायकवाडने कुस्ती सोडून दिली त्यामुळे हर्षदला विजयी घोषित करण्यात आले.
स्काॅर्पिओ, ट्रॅक्टर मैदानात
मुख्य विजेत्या मल्लाला स्काॅर्पिओ देण्यात येणार असून, उपविजेत्या मल्लाला ट्रॅक्टर तर इतर वजनी गटातील विजेत्या व उपविजेत्या मल्लांना अनुक्रमे बुलेट व शाईन गाडी देण्यात येणार आहे.