‘महाराष्ट्र केसरी’ घोडकेची बाजी
By admin | Published: February 2, 2016 03:37 AM2016-02-02T03:37:02+5:302016-02-02T03:37:02+5:30
२०१२ मध्ये मीरा रोड येथे झालेल्या कुस्तीतील विजयी मल्ल महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याने रविवारी येथील अभिनव विद्यामंदिर पटांगणात पार पडलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात पुन्हा बाजी मारली.
भार्इंदर : २०१२ मध्ये मीरा रोड येथे झालेल्या कुस्तीतील विजयी मल्ल महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याने रविवारी येथील अभिनव विद्यामंदिर पटांगणात पार पडलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात पुन्हा बाजी मारली. आपल्या लौकिकानुसार खेळ करताना समाधानने सहज वर्चस्व राखले. तर प्रथमच महिलांसाठी खेळण्यात आलेल्या कुस्तीमध्ये भार्इंदरच्याच कोमल देसाईने विजेतेपदावर कब्जा केला.
संजीवनी फाउंडेशन व मीरा-भार्इंदर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैदानी कुस्ती स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व विटाच्या बेनापूर गावातील महाराष्ट्र चॅम्पियन अप्पा बुटे यांच्यात खेळविण्यात आली. यात घोडकेने तुफान पकडी करताना अवघ्या ७ मिनिटांत अप्पावर भारंदाज डाव साधून कुस्तीचा आखाडा मारला. घोडकेने आपला हिसका दाखवताना अप्पाला प्रत्युत्तराची संधीच दिली नाही. त्याने यापूर्वी २०१२ मध्ये मीरा रोड परिसरात आयोजिलेल्या कुस्तीमध्ये इंदूरचा मध्य प्रदेश केसरी बलराम यादवला धूळ चारली होती. कमी उंचीचा फायदा घेऊन कुस्तीमध्ये सुरुवातीपासून मुसंडी मारून कमीतकमी वेळात कुस्ती निकाली काढण्याची कला त्याच्यात असल्याने प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला तो पळती भुई थोडी करीत असल्याचे मीरा-भार्इंदर कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस वसंत पाटील यांनी सांगितले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कोल्हापूरचाच यशवंत केसरी राजू यमगर व बनारसचा यूपी केसरी राजू यादव यांच्यात बरोबरीने सोडविण्यात आली. त्याचवेळी शहरात यंदा प्रथमच महिलांची कुस्ती खेळविण्यात आली. यामध्ये मीरा-भार्इंदरमधील श्री गणेश व्यायामशाळेच्या कोमल देसाईने मुंबई पोलिसाच्या कुमोद पाटील हिच्यावर मात केली. एकूण १०० सहभागी पहिलवानांच्या ५० कुस्त्या या वेळी खेळविण्यात येऊन विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी खा. संजीव नाईक, फाउंडेशनचे अध्यक्ष ध्रुवकिशोर पाटील, पदाधिकारी अंकुश मालुसरे, हर्षल पाटील, ठाणे पोलीस क्रीडा विभागाच्या प्रमुख स्रेहा करनाळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष संजय शेटे व इतर मान्यवरांनी हजेरी लावली होती. (प्रतिनिधी)