मल्लविद्येचा शिरपेच ‘महाराष्ट्र केसरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:48 AM2017-12-19T00:48:53+5:302017-12-19T00:49:10+5:30

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.

 'Maharashtra Kesari' as the title of 'Mallavidyai' | मल्लविद्येचा शिरपेच ‘महाराष्ट्र केसरी’

मल्लविद्येचा शिरपेच ‘महाराष्ट्र केसरी’

Next

महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाहीत, एवढे कुस्तीप्रमींच्या मनात खोलवर रुजलेले आहेत.
मल्लविद्येतील आपल्या अखंड तपश्चर्येने १९६४ व ६५ मध्ये गणपतराव खेडकर, १९६७ व ६८ मध्ये चंबा मुत्नाळ, १९६९-७० मध्ये दादू चौगुले, १९७२-७३ मध्ये लक्ष्मण वडार, तर २००७-०८ मध्ये चंद्रहार पाटील यांनी डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळवून देदीप्यमान कामगिरी केली. ‘वीरपुरुष जन्माला येतात ते इतिहास निर्माण करण्यासाठी’ या उक्तीप्रमाणे आणि आपल्या नावातच पराक्रमी पुरुषाचा अर्थ सामावलेल्या मुंबईच्या नरसिंग यादवने महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्ट्रिक करीत ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केली. परंतु पराक्रमी पुरुषांची जननी असलेल्या या महाराष्ट्राच्या रणमैदानात जणू काही अद्वितीय कामगिरी करून इतिहास निर्माण करण्याची चढाओढच लागली होती. २०१४ ते २०१६ या कालावधीत जळगावच्या विजय चौधरीने नरसिंगच्या पराक्रमाची बरोबरी करीत महाराष्ट्र केसरीची हॅट्ट्रिक मिळवून दिग्विजयाचा डंका वाजविला.
१९६१ पासून १९८७ पर्यंत महाराष्ट्र केसरी किताबाची लढत ही लाल मातीच्या आखाड्यामध्ये होत होती. परंतु कुस्तीची जननी लाल माती तिला न विसरता आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्रातील मल्लांची कामगिरी उंचावली पाहिजे ही विचारधारणा मनात ठेवून कुस्तीमहर्षी बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत मॅटवर खेळविण्याची संकल्पना कार्यकारिणीमध्ये मांडून १९८८ पासून अंतिम लढतीसाठी मॅटवर प्रारंभ झाला. चापल्य आणि वेग यांचा सुरेख संगम साधत सोलापूर जिल्ह्यातील निमगावच्या रावसाहेब मगरने मॅटवरील अंतिम फेरीची लढत जिंकून महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी गावच्या पिता व पुत्र हिरामण बनकर आणि विजय बनकर त्याचप्रमाणे कोल्हापूरचे दादू चौगुले व विनोद चौगुले यांनी मिळवलेले महाराष्ट्र केसरीचे किताब कुस्तीक्षेत्रातील पराक्रमाचे अलौकिक ऐतिहासिक पान म्हणून लिहावे लागेल. अशा अद्वितीय, अविस्मरणीय पराक्रम लाभलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाची पुढील गाथा लिहिण्यासाठी मुळशी तालुक्यातील भूगाव सज्ज झाले आहे.
-दिनेश गुंड(आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच)

Web Title:  'Maharashtra Kesari' as the title of 'Mallavidyai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.