‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती : चंद्रहार पाटीलला पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:47 AM2017-12-23T01:47:05+5:302017-12-23T01:47:21+5:30

भूगाव येथे सुरू असलेल्या ६१ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तिस-या दिवशी रंगत आली. माती व गादी विभागातील लढतीने प्रेक्षकांची मने जिंकली. सकाळपासूनच प्रेक्षकांनी कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेक धक्कादायक निकालाची नोंद आजच्या दिवशी झाली. सकाळच्या सत्रात प्रेक्षणीय लढती झाल्या.

 'Maharashtra Kesari' wrestling: The defeat of Chandrabhad Patil | ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती : चंद्रहार पाटीलला पराभवाचा धक्का

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती : चंद्रहार पाटीलला पराभवाचा धक्का

Next

गोरख माझिरे
भूगाव : भूगाव येथे सुरू असलेल्या ६१ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तिस-या दिवशी रंगत आली. माती व गादी विभागातील लढतीने प्रेक्षकांची मने जिंकली. सकाळपासूनच प्रेक्षकांनी कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेक धक्कादायक निकालाची नोंद आजच्या दिवशी झाली. सकाळच्या सत्रात प्रेक्षणीय लढती झाल्या.
गादी विभागात संभाव्य विजेत्या आणि डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटीलला अवघ्या दीड मिनिटामध्ये हिंगोलीच्या गणेश जगतापविरुद्ध पराभवाची चव चाखावी लागली. चंद्रहारला मोठा पाठिंबा मिळत असताना गणेशने कोणतेही दडपण न घेता पहिल्याच फेरीत दुहेरी पट काढला. यानंतर चंद्रहारनेही पुनरागमनाचे प्रयत्न केले. पण त्यात तो अपयशी ठरला. यानंतर मात्र गणेशला अनुभवी अभिजीत कटकेविरुद्ध ३-७ असा पराभव पत्करावा लागला.
माती विभागाच्या ६१ किलो गट अंतिम फेरीत पुण्याच्या सूरज कोकाटे वि. सांगलीचा राहुल पाटील अशी लढत झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत सूरज कोकाटेने राहुल पाटीलला चितपट करीत सुवर्णपदक मिळवले. ७० किलो वजन गटात पुण्याच्या अरुण खेंगलेने औरंगाबादच्या अजर पटेल याला भारंदाज डावाद्वारे तांत्रिक गुणाधिक्याच्या आधारे (१0-१) मात करुन सलग दुसºयांदा सुवर्ण पदकाची कमाई केली.
अभिजीत कटके विजयी
पुणे शहरच्या अभिजितने पुणे जिल्हाच्या शिवराज राक्षेविरुद्ध सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला आणि ३ गुणांची कमाई केली. शिवराजने दुहेरी पटाची पकड करुन २ गुणांची कमाई केली. मध्यंतरानंतर अभिजितने आक्रमक खेळ कायम राखला. पण दुखापतीमुळे शिवराजला मैदान सोडावे लागले. यानंतर अभिजीतने धक्कादायक निकाल नोंदवलेल्या गणेशला ७-३ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
सागर बिराजदारची आगेकूच
लातूरच्या सागर बिराजदारसमोर सलामीला मुंबईच्या विक्रांत जाधवचे आव्हान ४-०ने परतविले. सुरुवातीला दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला. यानंतर सागरने एक गुण घेत आघाडी घेतली. दोन्ही मल्लांनी नकारार्थी कुस्ती करायला सुरुवात केली. मात्र, सागरने वेळीच सावरत कौशल्य दाखवले. त्याने साल्तो डाव टाकला आणि गुणांची कमाई केली.
वादग्रस्त कुस्ती...
बिडच्या अक्षय शिंदेने पुण्याच्या सचिन येलभरला नमविले. ही कुस्ती काहीशी वादग्रस्त ठरली. पहिल्या फेरी अखेर सचिन ३-२ने आघाडीवर होता. दुसºया फेरीत दोन्ही मल्लांनी वेळ काढला. पण लढत संपायला आणि अक्षयने गुण घेण्याची एकच वेळ झाली. नियमानुसार (अखेरचा गुण घेणारा विजयी) पंचांनी अक्षयला विजयी ठरविले. पण वेळ संपल्याचा सचिन समर्थकाचा दावा होता.
अंतिम निकाल
माती विभाग
६१ किलो: १) सुरज कोकाटे
(पुणे जिल्हा), २) राहुल पाटील (सांगली), ३) आकाश माने (सातारा)
७० किलो : १) अरुण खेंगले
(पुणे जिल्हा), २) अजर पटेल (औरंगाबाद), ३) आलीम शेख (लातूर)
८६ किलो : १) दत्ता नरळे (सोलापूर जिल्हा), २) सुहास गोडगे (मुंबई पश्चिम), ३) नागनाथ माने (रत्नागिरी)
गादी विभाग
६१ किलो : १) सौरभ पाटील (कोल्हापूर जिल्हा), २) आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा), ३) तुकाराम शितोळे (पुणे जिल्हा), ३)प्रकाश कोळेकर (सांगली)
७० किलो : १) आकाश देशमुख (लातूर), २) दिनेश मोकाशी (पुणे जिल्हा), ३)सनी मेटे (नाशिक शहर), ३) स्वप्नील काशिद (सोलापूर शहर)
८६ किलो : १) प्रसाद सस्ते (पिंपरी चिंचवड), २) संजय सूळ (सातारा), ३) ऋषिकेश पाटील (कोल्हापूर जिल्हा), ३) अक्षय कावरे (अहमदनगर)

Web Title:  'Maharashtra Kesari' wrestling: The defeat of Chandrabhad Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे