महाराष्ट्र केसरी कुस्ती : गतविजेता बालारफिक शेख चितपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:01 PM2020-01-06T18:01:41+5:302020-01-06T18:10:45+5:30
हफ्ता डावावर माऊली जमदाडेची बाजी
पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोमवारी माती विभागात धक्कादायक निकालाची नोंद झाली. २०१८चा महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख याला चक्क चितपट करून सोलापूर शहर संघाच्या माऊली उर्फ जमदाडे याने खळबळ उडवून दिली.गत उपविजेता अभिजीत कटकेही पराभूत. नाशिकच्या हर्षवर्धन सदगिरने त्या हरवले.
पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. माती विभागात झालेल्या पाचव्या फेरीत बुलडाण्याच्या बालारफिक याने चांगला प्रारंभ केला. पहिल्याच मिनिटात त्याने गुण घेतला. त्यानंतर काही क्षणांनी बालारफिकने माऊलीची वरून पकड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उंचपुऱ्या माऊलीने चपळाईने हफ्ता डाव टाकून बालारफिकला अस्मान दाखविले.
या विजयासह माऊलीने माती विभागातून उपांत्य फेरी गाठली. माती विभागातील विजेता आणि गादी विभागातील विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबाची लढत होणार आहे.
पैलवान हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्हा याने अभिजीत कटकेवर 5-2 गुणांनी विजय मिळवला.अतिशय चित्तथरारक झालेल्या कुस्तीमध्ये पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारातील अनुभव यासह नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय व 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील अनुभवाचा पुरेपूर फायदा झाला. मूळचा अकोले येथील हर्षवर्धनने नाशिकमधील भगुरच्या बलकवडे व्यायामशाळा येथे दहा वर्ष प्रशिक्षण घेतले आहे. पैलवान हर्षवर्धन सदगीर याने काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्षे सराव केलेला आहे