महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, गतविजेत्यांची दमदार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 06:03 AM2020-01-05T06:03:25+5:302020-01-05T06:03:32+5:30

पुणे शहर संघाचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाला रफिक शेख या गतविजेत्या मल्लांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी आपल्या मोहिमेचा विजयी प्रारंभ करताना प्रतिस्पर्ध्यांवर सहजपणे मात केली.

Maharashtra Kesari Wrestling Tournament, Fast Start Winners | महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, गतविजेत्यांची दमदार सुरुवात

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, गतविजेत्यांची दमदार सुरुवात

googlenewsNext

पुणे : पुणे शहर संघाचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाला रफिक शेख या गतविजेत्या मल्लांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी आपल्या मोहिमेचा विजयी प्रारंभ करताना प्रतिस्पर्ध्यांवर सहजपणे मात केली. लातूरचा सागर बिराजदार, मुंबईचा समाधान पाटील, सोलापूर शहरचा योगेश पवार यांनीही आपापल्या लढती जिंकल्या.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ खुल्या गटाच्या पहिल्या लढतीत अभिजित कटकेने गादी विभागात अमरावतीच्या मिर्झा नदीम बेग याला अवघ्या
६ सेकंदांत चीतपट करून बाजी मारली. त्याने ही लढत जिंकताच स्टेडियममध्ये उपस्थित कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला.
गादी विभागाच्या लक्षवेधी लढतीत सागर बिराजदारने नांदेडच्या विक्रम वडतिले याच्यावर १९ सेकंदांत १० गुणांच्या तांत्रिक गुणधिक्याने विजय मिळविला. समाधान पाटीलने हिंगोलीच्या दादुमिया मिलानी याच्यावर ७-२ ने मात केली. योगेश पवारने ठाणे जिल्ह्याच्या साहिल पाटीलचा ११-६ने पराभव केला. प्रतिस्पर्धी अनुपस्थित असल्याने विष्णू खोसे याला पुढे चाल मिळाली.
माती विभागातून बाला रफिक शेखने दणक्यात विजयी प्रारंभ करताना दुसरी फेरी गाठली. त्याने अमरावतीच्या हर्षल आकोटकरवर
१०-० अशी तांत्रिक गुणधिक्याने सरशी साधली. सिकंदर शेख (वाशिम), संकेत घाडगे (पिंपरी-चिंचवड), सागर मोहलकर (अहमदनगर), संतोष लवाटे (कोल्हापूर जिल्हा), उमेश सिरतोडे (वर्धा), शुभम जाधव (यवतमाळ) यांनीही माती विभागातील आपापल्या लढती जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
माती विभागातील ६१ किलो वजन गटात पुणे जिल्ह्याच्या सागर मारकडने पुणे शहर संघाच्या निखिल कदमला चितपट करून सुवर्ण पदकावर कब्जा केला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील त्याचे हे पाचवे सुवर्ण ठरले. यापूर्वीची ४ सुवर्णपदके त्याने ५७ किलो वजन गटातून जिंकली होती. सागर हा इंदापुरातील मारकड कुस्ती केंद्र, इंदापूर येथे प्रशिक्षण घेत आहे.
उपांत्य फेरीत सागर मारकडने औरंगाबादच्या सौरभ राऊतला उपांत्य फेरीत चितपट विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती. निखिल कदमने सोलापूरच्या हनुमंत शिंदेवर २-१ने मात करीत विजेतेपदासाठी दावेदारी सांगितली होती. मात्र, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात सोलापूर जिल्हा संघाचा हणुमंत शिंदे विजयी ठरला. त्याने सौरभ राऊतला (औरंगाबाद शहर) १२-३ ने सहजपणे नमविले.
पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या सहआयुक्त स्मिता पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पदके प्रदान करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रुस्तुम-ए-हिंद अमोल बुचडे, सुनील तरटे, कुस्ती परिषदेचे उपाध्यक्ष गणेश कोहळे, परिषदेचे कार्यालयीन अधिकारी ललित लांडगे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
>इतर निकाल
७९ किलो गादी विभाग
सुवर्ण- रामचंद्र कांबळे (सोलापूर)
रौप्य -रवींद्र खैरे (उस्मानाबाद)
कांस्य- केवल भिंगारे (अहमदनगर)
कांस्य -श्रीधर मुळीक (सातारा)५७ किलो वजनी गट गादी विभाग
सुवर्ण - ज्योतिबा अटकळे (सोलापूर)
रौप्य- रमेश इंगवले (कोल्हापूर)
कांस्य - आतिष तोडकर (बीड)
कांस्य - संकेत ठाकूर (पुणे शहर)

Web Title: Maharashtra Kesari Wrestling Tournament, Fast Start Winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.