महाराष्ट्र संघ ठरला ‘चॅम्पियन’
By admin | Published: June 15, 2017 01:48 AM2017-06-15T01:48:07+5:302017-06-15T01:48:07+5:30
येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना, सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली, तसेच ज्युनिअर स्पर्धेसोबतच
लोकमत न्यूज नेटवर्क
डेहराडून : येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना, सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली, तसेच ज्युनिअर स्पर्धेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फेडरेशन कप पिकलबॉल स्पर्धेत मात्र राजस्थानने बाजी मारली. निर्णायक सामन्यांमध्ये केलेल्या चुकांमुळे महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
डेहराडून येथील परेड मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ज्युनिअर गटात महाराष्ट्राने जबरदस्त खेळ केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात, कृष्णा मंत्रीने यश पाटीलचा ११-१, ११-४ असा धुव्वा उडवून सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या गटात मात्र, राजस्थानच्या गीतम शर्माने बाजी मारत, यजमान उत्तराखंडच्या खुशी थोपाचे आव्हान ११-१, ११-० असे परतावले, तसेच कांस्य पदकाची लढत महाराष्ट्राच्याच खेळाडूंमध्ये झाली. साक्षी बाविस्करने ॠतुजा कालिकेचा ११-५, ११-० असा पराभव केला.
मुलांच्या दुहेरी अंतिम लढतीत अजय चौधरी-मयूर पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने सुवर्ण पटकावताना झारखंडच्या मोहम्मद जैद - मोहम्मद शाबिद अन्सारी यांचा ११-३, ११-४ असा फडशा पाडला. मुलींच्या दुहेरीमध्ये इशीका मालोदे-सलोनी देवडा या महाराष्ट्राच्या जोडीने समीक्षा शेखावत-साक्षी शेखावत या राजस्थानच्या जोडीचा ११-४, ११-२ असा धुव्वा उडवला. मिश्र दुहेरीत निशा बरेला-कुलदीप महाजन या महाराष्ट्राच्या जोडीने तुफानी खेळ करताना, कुलदीप-पिंकी या दिल्लीकरांचा ११-१, ११-० असा फडशा पाडून सुवर्ण पटकावले.