राज्याच्या शाळांमध्ये 48 'नवे' खेळ; पण हे खेळून ऑलिम्पिकपटू कसे घडतील बुवा?
By स्वदेश घाणेकर | Published: August 30, 2019 01:21 PM2019-08-30T13:21:34+5:302019-08-30T13:24:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून 'Fit India' मोहीमेचा श्रीगणेशा केला. खेळ हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे आणि त्याने शरीर कसं तंदुरुस्त राहतं, हे पंतप्रधानांनी समजावून सांगितलं.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून 'Fit India' मोहीमेचा श्रीगणेशा केला. खेळ हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे आणि त्याने शरीर कसं तंदुरुस्त राहतं, हे पंतप्रधानांनी समजावून सांगितलं. मोदींचे भाषण संपताच महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी लगेचच शालेय स्तरावरील ४८ खेळांना मान्यता दिली. तसे तातडीची बातमी त्यांच्याकडून पाठवण्यात आली. क्रीडा मंत्र्यांच्या या तत्परतेचं स्वागत, परंतु नव्याने समाविष्ठ केलेल्या खेळांत असे अनेक खेळ आहेत, की ज्यांची नावे उच्चारतानाही जिभेला १८० च्या कोनात फिरवावे लागेल. शिवाय क्रीडा खात्याकडून आलेली ४८ खेळांची यादी फुगवलेल्याचे जाणवते.
राज्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या चूका काढण्यापूर्वी आपण काही प्रश्नांची उत्तर शोधूया. भारताला कुस्तीत पहिले ऑलिम्पिक पटकावून देणारे दिवंगत खाशाबा जाधव, हे महाराष्ट्राचे, त्यांच्यानंतर महाराष्ट्रात किती ऑलिम्पिक कुस्तीपटू घडले? बॅडमिंटन पूर्वी ठाणे, पुण्यात मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. पण, मग महाराष्ट्रातून का नाही एखादी सायना, सिंधू घडवता आली? ॲथलेटिक्स, नेमबाजीत महाराष्ट्राचे ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व दिसते, परंतु त्यातही बऱ्याच सुधारणेस वाव आहे. आता या संगळ्यांची उत्तरं शोधताना राजकीय मंडळी आधीचे सरकार आणि आमचे सरकार अशी टोलवाटोलवीची उत्तरं देतील हे अपेक्षित आहेत. त्यामुळे हा मुद्दा जरा बाजूलाच ठेवूया.
क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून ४८ खेळांना शालेय स्तरावर मान्यता दिली. या खेळांची यादी जाहीर करताना क्रीडा खात्याने ४-५ खेळांची नावं पुन्हा पुन्हा कॉपी पेस्ट करून खेळांचा आकडा ४८ पर्यंत नेला. आता या फुगवलेल्या ४८ खेळांवर नजर टाकल्यास यातून महाराष्ट्राला तंदुरुस्त पिढी मिळेल, परंतु मोंदींचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पूर्ण होईल की नाही यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. ऑलिम्पिक सोडा शालेय स्तरानंतर या खेळांच्या भविष्याचाच प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे. मग केवळ पाच गुंणांसाठी हे खेळ मुलांनी खेळावे का?
राष्ट्रीय क्रीडा दिनी मान्यता दिलेल्या खेळांची यादी...
तेंग सू डो, जित कुने दो, लंगडी, लगोरी, कुडो, टेक्निक्वाईट, टेनिस बॉल क्रिकेट, टेनिस व्हॉलिबॉल, युनिफाईट, कॉर्फ बॉल, सुपर सेव्हन क्रिकेट, हुप कॉर्न दो, युग मुनं दो, वोवीनाम, टेबल सॉकर... आदी खेळ आता शालेय स्तरावर खेळवली जाणार आहेत. केवळ तंदुरुस्तीसाठी यांचा समावेश करण्यात आला असेल तर स्वागतार्ह, पण असे खेळ शालेय स्तरावार न खेळवता ऑलिम्पिक, आशियाई खेळांची शालेय स्तरापासून सुरुवात करायला हवी. 2017च्या कुमार ( 17 वर्षांखालील) फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन भारताने केले. त्यानंतर तत्कालिन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी फुटबॉल मोहीमेची घोषणा केली होती. त्याचे काय झाले, याचे उत्तर गुलदस्तातच आहे. पण, काल जाहीर करण्यात आलेल्या यादीत पुन्हा फुटबॉलचा समावेश करण्यात आलेला पाहायला मिळतो. म्हणजे आधीच्या शालेय स्पर्धांत फुटबॉलचा समावेश नव्हता का?
मोदी म्हणाले खेळ खेळा, म्हणून कोणतेही खेळ समाविष्ट न करता मुलांना शालेय स्तरापासूनच योग्य मार्गदर्शन मिळेल अशा खेळांचा समावेश झाला पाहिजे आणि त्या खेळांसाठी सक्षम यंत्रणा शालेय स्तरापासून उभी केली गेली पाहिजे. आज शालेय स्तरावर हॉकी या आपल्या राष्ट्रीय खेळाची काय अवस्था आहे, ते पाहा. हॉकी मॅटवर गेली आणि आपण अजूनही लहान मुलांना ग्राऊंडवर खेळवतोय. हॉकीच्या स्पर्धांतही सातत्य नाही.. नेमबाजी, तिरंदाजी, कुस्ती आदी खेळांच्या बाबतितही परिस्थिती साधारण अशीच आहे. मग महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिकपटू कसे घडवणार?