महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने भारताला मिळवून दिले तिसरे कांस्य पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 06:16 AM2024-08-02T06:16:06+5:302024-08-02T06:18:39+5:30

५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत पहिलेच ऑलिम्पिक पदक, खाशाबा जाधव यांच्यानंतरचा दुसरा मराठमोळा ऑलिम्पिक पदकविजेता खेळाडू

maharashtra swapnil kusale won india third bronze medal in paris olympic 2024 | महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने भारताला मिळवून दिले तिसरे कांस्य पदक

महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळेने भारताला मिळवून दिले तिसरे कांस्य पदक

शेटराउ (फ्रान्स) : युवा नेमबाज स्वप्निल कुसाळे याने गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी करताना ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिले. नेमबाजीच्या या प्रकारात ऑलिम्पिक पदक मिळवणारा स्वप्निल पहिला भारतीय ठरला. 

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्निल हा दिवंगत कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्यानंतरचा केवळ दुसरा मराठमोळा खेळाडूही ठरला. ५० मीटर थ्री पोझिशन रायफल नेमबाजीतील हे भारताचे पहिलेवहिले ऑलिम्पिक पदक ठरले. यंदाची ऑलिम्पिक भारतासाठी नेमबाजांनी गाजवली. आतापर्यंत भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन पदके मिळवली असून हे तिन्ही पदके नेमबाजांनी जिंकली आहेत. २०१६ सालच्या रिओ आणि २०२१ सालच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. परंतु, यंदा भारतीय नेमबाजांनी ही कसर भरून काढताना शानदार 'हॅट्ट्रिक' नोंदविली. 

कर्ज काढून मुलाला खेळवलं, त्यानं कष्टाचं माेल जाणलं!

नेमबाजी हा तसा महागडा खेळ. स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे हे शिक्षक असले तरी त्यांना मुलाची नेमबाजीतील हौस पूर्ण करण्याइतपत परिस्थिती नव्हती. मुलाची नेमबाजीमधील आवड अन् जिद्द पाहून वडिलांनी कर्ज काढून त्याच्या खेळाला बळ दिले. मुलाच्या विजयाच्या आनंद कुसाळे कुटुंबीयांच्या गगनात मावेनासा झाला. कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील घरी आई अनिता, वडील सुरेश यांच्यासह आजी, काका आणि भाऊ यांनी स्वप्निलचा फोटो घेऊन विजयाचा आनंद साजरा केला. 

उपाशीपोटी घेतला पदकाचा वेध

नेमबाजीच्या अंतिम फेरीत स्वप्निल उपाशीपोटी खेळला. या ऐतिहासिक यशानंतर त्याने सांगितले की, 'मी या लढतीआधी काहीच खाल्ले नव्हते. प्रत्येक सामन्याआधी मी देवाकडे प्रार्थना करतो. ब्लॅक टी पिऊन मी रेंजवर आलो. आज ह्रदयाचे ठोके खूप वाढले होते. मी केवळ श्वासावर नियंत्रण ठेवले आणि काही वेगळे करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. या स्तरावर सर्व खेळाडू एकसमान असतात. मी अखेरपर्यंत स्कोअरबोर्डकडे पाहिले नाही. अनेक वर्षांच्या माझ्या मेहनतीचा विचार करत होतो.'

महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर आनंद  

तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्निल कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच स्वप्निलला राज्य सरकारतर्फे एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील फोनवरुन संवाद साधत  कुसाळे परिवाराचे अभिनंदन केले. स्वप्निलने भारताची मान उंचावत महाराष्ट्राचाही गौरव वाढविला, अशा शब्दात फडणवीस यांनी त्याचे कौतुक केले.

आजी म्हणते, मुके घेऊन कौतुक करणार

नातवाच्या पराक्रमाने स्वप्निलच्या आजीचा आनंद गगनात मावेना झाला. तो परत येताच त्याचे मुके घेऊन कौतुक करणार, या शब्दांत त्यांनी नातवाचे अभिनंदन केले.

मुलगा कधी ना कधी या खेळात नाव कमवेल हा विश्वास होता. तो विश्वास त्याने सार्थ ठरविला. त्याने आमच्या कष्टाची जाणीव ठेवत हे यश मिळवले. - सुरेश कुसाळे, स्वप्निलचे वडील.

मुलाचे दहा-बारा वर्षांचे कष्ट फळाला येतील. तो भारताचा तिरंगा खाली पडू देणार नाही, हा विश्वास होता. - अनिता कुसाळे, स्वप्निलची आई.

 

Web Title: maharashtra swapnil kusale won india third bronze medal in paris olympic 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.