राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:52 AM2019-01-26T05:52:14+5:302019-01-26T05:52:23+5:30
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रोहा-रायगड येथे २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रोहा-रायगड येथे २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्टÑाचा संघ जाहीर झाला असून गिरिश एर्नाक याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
गतवर्षी आपल्या भक्कम बचावाच्या खेळामुळे महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ठाण्याच्या गिरीशच्या गळ्यात संघाच्या नेतृत्वाची माळ पडली. कोल्हापूरच्या तुषार पाटीलला उप कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. या संघात रायगड, पुणे, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्याच्या दोन-दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे. तर मुंबई, उपनगर, सांगली, कोल्हापूर यांचा एक खेळाडू या संघात आहे.
सिद्धार्थ देसाईला मात्र महाराष्ट्राच्या संघाबाहेर बसावे लागले. सिद्धार्थ रेल्वेमध्ये नोकरी करत आहे. त्याने आंतर रेल्वे कबड्डी स्पर्धेत दक्षिण-मध्य रेल्वेला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याचा समावेश अलिबाग येथे झालेल्या महाराष्ट्र संघाच्या शिबिरात करण्यात आला होता. महाराष्ट्र संघाकडून खेळण्यासाठी सिद्धार्थने रेल्वेचा राजीनामा दिला, पण रेल्वेने तो स्वीकारला नाही. त्याला रेल्वेकडूनही ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने तो महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
>महाराष्ट्राचा संघ
गिरीश एरनाक - कर्णधार (ठाणे), तुषार पाटील - उपकर्णधार (कोल्हापूर), विशाल माने (मुं. शहर), रिशांक देवाडीगा (मुं. उपनगर), विकास काळे (पुणे), अमीर धुमाळ (रायगड), निलेश साळुंखे (ठाणे), सचिन शिंगाडे (सांगली), अभिषेक भोजने (रत्नागिरी), सुनील दुबिले (पुणे), अजिंक्य पवार (रत्नागिरी), संकेत बनकर (रायगड). प्रशिक्षक : प्रताप शिंदे (मुं. उपनगर), व्यवस्थापक : मनोज पाटील (ठाणे).