राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 09:12 PM2019-12-21T21:12:52+5:302019-12-21T21:13:28+5:30
महाराष्ट्राच्या चमूमध्ये सागर राणे, केवल पाटील, अश्विन धर्मे, प्रितेश गर्मे व रोहित मेहरे यांचा समावेश आहे.
अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणावर पार पडलेल्या राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल ठरला. या तीन दिवसीय स्पर्धेत पुरुष, महिला, एकेरी, पोल, रोप व हँगिंग अशा तिहेरी गटांमध्ये झुंज रंगली. या पहिल्यावहिल्या स्पर्धेचा महाराष्ट्र राज्य विजेता ठरला आहे.
महाराष्ट्राच्या चमूमध्ये सागर राणे, केवल पाटील, अश्विन धर्मे, प्रितेश गर्मे व रोहित मेहरे यांचा समावेश आहे. एकेरी स्पर्धेमध्ये प्रीतेश गर्मे याने २५.०५० तर सागर राणे याने २४.९५० अंक पटकावित अव्वल ठरले. मुलींच्या चमू गटात महाराष्ट्राने ४१.६२ अंक पटकावित आपला दबदबा कायम ठेवला. प्रथम ठरलेल्या महाराष्ट्राच्या चमूमध्ये अनुष्का नाईक, पल्लवी शिंदे, समृद्घी डहाके, आर्या भोयर, अदिती करमंबेकळ व निर्मल चौधरी यांचा समावेश होता. राष्ट्रीय एकेरी स्पर्धेत पल्लवी शिंदे ९ अंकांसह अव्वल ठरली व तिसºया क्रमांकावर महाराष्ट्राची अनुष्का नाईक यशस्वी ठरली. पोल मल्लखांब स्पर्धेत सागर राणे ८.८०, तर निहाल विचारे ८.७६ अंक पटकावित प्रथम ठरले. हँगिंग मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रीतेश गर्मे ८.६० व केवल पाटील ८.५३ अंक घेऊन अव्वल ठरलेत. रोप मल्लखांब स्पर्धेत सागर राणे याने ८.५६ व प्रीतेश गर्मे याने ८.४० अंक प्राप्त करीत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एक भारत श्रेष्ठ भारत, खेलो इंडिया व भारतीय मल्लखांब संघटनेच्यावतीने राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे प्रथमच अमरावतीत आयोजन झाले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शनिवारी समारोपीय कार्यक्रम पार पडला. मार्गदर्शक म्हणून मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, अध्यक्ष मल्लखांब फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष रमेश इंदौलिया उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसूम साहू, मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष धरमवीर सिंह, कोषाध्यक्ष दिलीप गव्हाणे, प्राचार्य के.के देबनाथ व निरीक्षक (साई) रामकृष्ण लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन गटांतील या स्पर्धेत महाराष्ट्रासह हरियाणा, गोवा, तामिळनाडू, ओडिशा, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, लद्दाख या आठ राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी दर्जेदार प्रदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना चषक, प्रमाणपत्र देत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे मुख्य संयोजक विलास दलाल व संचालन आशिष हाटेकर यांनी केले. आभार लक्ष्मीकांत खंडागडे यांनी मानले.