राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला चार सुवर्णपदके
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 06:51 PM2018-09-18T18:51:53+5:302018-09-18T18:52:47+5:30
आंध्र प्रदेशातील सत्तेनापल्ली येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चार सुवर्ण , एक रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण सहा पदकांची कमाई केली.
मुंबई : आंध्र प्रदेशातील सत्तेनापल्ली येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चार सुवर्ण , एक रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण सहा पदकांची कमाई केली. पुरुषांमध्ये संदीप अवारी आणि निलेश गराटे यांनी, तर महिलांमध्ये सोनल सावंत व भक्ती आंब्रे यांनी बाजी मारली. अटीतटीच्या लढतीमध्ये अभिजीत गुरवने रौप्यपदक जिंकले. याशिवाय आंतरराज्य लढतीत किरण सणसने कांस्यपदक जिंकले.
ठाणे शहरात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या संदीपने पुरुषांच्या १०५ किलो वजनी गटात एकूण ९०० किलो वजन उचलले आणि उत्तरेच्या खेळाडूंवर मात केली व सुवर्णपदकासह स्ट्राँग मन ऑफ इंडियाचा तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरला. ८३ किलो गटात निलेशने एकूण ८१० किलो वजन उचलून तामिळनाडूच्या खेळाडूंना मागे टाकले. या दोघांनी वरिष्ट राष्ट्रीय स्पर्धेत बऱ्याच वर्षांनी
महाराष्ट्राला सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला. ६६ किलो गटात अभिजीतने ६७७.५ किलो वजन उचलले व तामिळनाडूच्या सुवर्णपदक विजेत्या बी. गोविंदस्वामीने तितकेच वजन उचलले, परंतु गोविंदस्वामीचे शारीरिक वजन वीस ग्रॅम कमी असल्यामुळे तांत्रिक गुणांच्या आधारे अभिजीतचे सुवर्णपदक निसटले. ७४ किलो गटात किरण सनसने ७०२.५ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.
महिलांमध्ये ८४ किलो वजनी गटात भक्ती आंब्रेने एकूण ५०७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. ती पंजाब आणि तामिळनाडूच्या खेळाडूंपेक्षा सरस ठरली. ५७ किलो गटात सोनल सावंत अव्वल ठरली. तिने एकंदर ४३० किलो वजन उचलले. या स्पर्धेत आंतरराज्य स्पर्धेत पुरुष व महिलांचे सांघिक विजेतेपद व ओव्हरऑल स्पर्धेत सांघिक तिसऱ्या क्रमांकाचे सांघिक विजेतेपद मिळवले.