एक डाव धोबीपछाड; मराठमोळा मल्ल राहुल आवारेला सापडला ऑलिम्पिक प्रवेशाचा राज(धानी)मार्ग!
By स्वदेश घाणेकर | Published: February 23, 2019 11:46 AM2019-02-23T11:46:06+5:302019-02-23T11:47:38+5:30
LMOTY 2019 : महाराष्ट्रातील मल्ल मात्र 'महाराष्ट्र केसरी ते हिंद केसरी' या प्रवासातच धन्य मानत आले आहेत.
- स्वदेश घाणेकर
मुंबई : कुस्तीत नेहमी उत्तर भारतातील खेळाडू अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच अनेक आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक खेळाडू येथूनच घडले. महाराष्ट्रातील मल्ल मात्र 'महाराष्ट्र केसरी ते हिंद केसरी' या प्रवासातच धन्य मानत आले आहेत. ही चौकट मोडून मराठमोळा मल्ल ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहत आहे आणि त्यासाठी अथक मेहनतही घेत आहे. त्याच्या या मार्गात अनेक अडथळे आले, परंतु तो खचला नाही... जिद्दीने पुढे चालत राहिला. या लढाऊ बाण्याची दखल 'लोकमत'ने त्याला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' या पुरस्काराने गौरविले. 'लोकमतने दिलेला हा पुरस्कार मनोबल उंचावणारा आहे,' असे मत राहुलने व्यक्त केले. २०२० च्या ऑलिम्पिकचे तिकिट मिळवण्याचा निर्धारही त्याने 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.
( LMOTY 2019: कुस्तीच्या आखाड्यात तिरंगा फडकवणारा मराठमोळा राहुल आवारे ठरला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' )
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात संधी मिळेल असा ठाम विश्वास राहुलला होता. निवड स्पर्धेत राहुलने प्रतिस्पर्धी संदीप तोमरला पराभूत केले होते आणि विजय दहिया तिसऱ्या स्थानी होता. पण, तरीही राहुलला डावलण्यात आले आणि तोमरला ऑलिम्पिक पात्रता फेरीत पाठवण्यात आले. तोमर रिओत पहिल्याच फेरीत पराभूत झाला.. तोमरपेक्षा राहुलची कामगिरी चांगली झाली असती असे मत अनेक मल्लांनी व्यक्त केले होते. या दुजाभावामुळे राहुल खचला होता, परंतु त्याने हार मानली नव्हती.
२०१८ मध्ये त्याने गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकले आणि विरोधकांना चपराक लगावली. पुढील वर्षी टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी राहुल नवी दिल्लीत कसून सराव करत आहे. तो म्हणाला," ऑलिम्पिक स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यात सर्वोत्तम कामगिरी करून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत प्रवेश मिळवणे, हे पहिले लक्ष्य आहे. सुरुवातीला दिल्लीत आलो तेव्हा दडपण यायचे. सतत हरण्याचीच भीती वाटायची. पण आता येथील वातावरणाशी आणि 'डावपेचां'शी चांगलाच सरावलो आहे. जिद्दीने पुढे चालत राहायचं, मग कोणाला कितीही राजकारण खेळूदे."
राहुलने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा त्याला संधी मिळावी अशी मागणीही होत आहे. मागील ऑलिम्पिक स्पर्धा पात्रता फेरीसाठीच्या स्पर्धेत आलेला अनुभव विसरून राहुलला यंदा ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचा पताका डौलाने फडकवायचा आहे.
राहुलचे '10YearChallange'!
राहुलने २००८ मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. पुढच्याच वर्षी त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले. जागतिक कनिष्ठ स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले. त्यावेळी राहुलला 'लोकमत'च्या ' महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र त्याला पुरस्कार जिंकता आला नव्हता. २०१९ मध्ये मात्र त्याने या पुरस्कारावर नाव कोरले. तो म्हणाला," २००९ च्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्यावेळी मला नामांकन मिळाले होते आणि आज २०१९ मध्ये म्हणजेच दहा वर्षांनी मला हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार माझे मनोबल उंचावणारा आहे."