महाराष्ट्राचा बडोद्यावर विजय
By admin | Published: February 5, 2017 03:59 AM2017-02-05T03:59:48+5:302017-02-05T03:59:48+5:30
विजय झोलने अंकित बावणेसोबत केलेली भागीदारी आणि त्यानंतर निखिल नाईक आणि नौशाद शेख यांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या वादळी फलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने
औरंगाबाद : विजय झोलने अंकित बावणेसोबत केलेली भागीदारी आणि त्यानंतर निखिल नाईक आणि नौशाद शेख यांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या वादळी फलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने वडोदरा येथे शनिवारी झालेल्या मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य बडोदा संघावर शनिवारी त्यांच्या घरच्या मैदानावर ७ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.
केदार देवधर (१४) आणि मोनील पटेल (६) हे सलामीवीर ५.१ षटकांत धावफलकावर २९ धावांत गमावल्यानंतर दीपक हुडा आणि युसूफ पठाण यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९ षटकांतच केलेल्या ८० धावांच्या भागीदारीच्या बळावर बडोदा संघाने २० षटकांत ६ बाद १६८ धावा ठोकल्या. बडोदा संघाकडून युसूफ पठाणने ३५ चेंडूंतच ३ चौकार व ३ षटकारांसह ५६ आणि दीपक हुडा याने ४१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून निकीत धुमाळने १८ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात विजय झोलच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने विजयी लक्ष्य १९.५ षटकांत ३ फलंदाज गमावून पूर्ण केले. विजय झोलने जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या अंकित बावणे याच्या साथीने ५६ चेंडूंतच दुसऱ्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राच्या विजयाचा भक्कम पाया रचला. त्यानंतर निखिल नाईक आणि नौशाद शेख यांनी १३ चेंडूंत नाबाद ४० धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राच्या चित्तथरारक विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राकडून विजय झोलने सर्वाधिक ५० चेंडूंत सणसणीत ९ चौकार आणि एका टोलेजंग षटकारासह ६४ धावा केल्या. निखिल नाईकने १२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद २६, अंकित बावणे याने २८ चेंडूंत २ चौकार, एका षटकारासह २४, स्वप्निल गुगळेने २३ चेंडूंत ५ चौकारांसह २४ आणि नौशाद शेखने मोक्याच्या क्षणी अवघ्या ६ चेंडूंतच ३ षटकारांसह वादळी नाबाद २१ धावांची निर्णायक खेळी केली.
बडोदा संघाचा कर्णधार इरफान पठाण सर्वात महागडा गोलंदाज ठरला. इरफानने त्याच्या ४ षटकांत ४७ धावा मोजल्या.
संक्षिप्त धावफलक
बडोदा : २० षटकांत ६ बाद १६८. (दीपक हुडा ५३, युसूफ पठाण ५६. निकीत धुमाळ ३/१८, अनुपम संकलेचा १/३५, स्वप्निल गुगळे १/४).
महाराष्ट्र : १९.५ षटकांत ३ बाद १६९. (विजय झोल ६४, निखिल नाईक नाबाद २६, अंकित बावणे २४, स्वप्निल गुगळे २४, नौशाद शेख नाबाद २१. आर. आरोठे १/३८, बी. पठाण १/२९, स्वप्निल सिंग १/२५).