महाराष्ट्राचा ‘चौकार’

By admin | Published: June 14, 2016 03:36 AM2016-06-14T03:36:01+5:302016-06-14T03:36:01+5:30

चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात महाराष्ट्राने तुल्यबळ कोल्हापूरचा १६-१३ असा पाडाव करून २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत पुरुष गटाच्या जेतेपदाला गवसणी घातली.

Maharashtra's 'Four Roads' | महाराष्ट्राचा ‘चौकार’

महाराष्ट्राचा ‘चौकार’

Next

मुंबई : चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात महाराष्ट्राने तुल्यबळ कोल्हापूरचा १६-१३ असा पाडाव करून २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत पुरुष गटाच्या जेतेपदाला गवसणी घातली. तर महाराष्ट्राच्या महिलांनी कर्नाटकला ११-८ असे नमवत स्पर्धेत दुहेरी अजिंक्यपद मिळवण्याचा मान पटकावला. त्याचवेळी महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघांनीदेखील आपआपल्या अंतिम सामन्यात बाजी मारून २७व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.
भुवनेश्वर येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेच्या पुरुष गटात महाराष्ट्राने कसलेल्या कोल्हापूरविरुद्ध धमाकेदार सुरुवात केली. कोल्हापूरकरांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. महेश शिंदे (१.३०, ३ मिनिटे) आणि दीपक माने (३ मिनिटे) यांनी दमदार संरक्षण केले. तर प्रयाग कनगुटकरने २ व १.२० मिनिटे संरक्षण व एक बळी घेत अष्टपैलू खेळ केला. आक्रमणात नितीन ढोबळेने ५ गडी बाद केले. मध्यांतराला ७-६ अशी आघाडी राखल्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ९-७ असे वर्चस्व राखून कोल्हापूरकरांना नमवले.
त्याच वेळी महिला गटात मात्र अडखळती सुरुवात झाल्याने महाराष्ट्र संघ मध्यांतराला कर्नाटकविरुद्ध २ गुणांनी २-४ असा पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळाच्या जोरावर जबरदसत मुसंडी मारताना महाराष्ट्राने ९-४ अशी आघाडी घेत कर्नाटकच्या हातातील विजेतेपद हिसकावून आणले. ऐश्वर्या सावंत (३.३० व ३.२५ मिनिटे), श्वेता गवळी (२.४५ मिनिटे) आणि कविता घाणेकर (२.१५) यांनी निर्णायक संरक्षण केले. तर शीतल भोरने ५ बळी घेताना कर्नाटकचे कंबरडे मोडले. कर्नाटककडून सिंधू पी., मेधा के. एस. आणि जयश्री यांनी अपयशी झुंज दिली. (क्रीडा प्रतिनिधी)

ज्युनिअर्सचाही ‘डबल धमाका’
‘फेडरेशन चषक’ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिनिअर्स संघांनी वर्चस्व राखल्यानंतर किशोर - किशोरी संघांनी २७ व्या सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारून संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा राखला.
महाराष्ट्राच्या किशोर संघाने सहज विजेतेपद उंचावताना झारखंडचे आव्हान ८-७ असे एक गुण व २.३० मिनिटे राखून परतावले. शुभम थोरातने (२.३० आणि ५ मिनिटे) अफलातून संरक्षण करताना झारखंडच्या आव्हानातली हवा काढली. त्याचवेळी आदित्य देसाई, ॠतिक भोर यांचा अष्टपैलू खेळ व राहुल जाधवचे उत्कृष्ट संरक्षणही महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरले.
दुसरीकडे किशोरी अंतिम सामन्यात पहिल्या डावात ४-५ असे पिछाडीवर पडल्यानंतर महाराष्ट्राने कर्नाटकवर ११-०९ असा २ गुणांनी विजय नोंदवला. हर्शदा करेचा अष्टपैलू खेळ आणि साक्षी करे, ऋतुजा हाके व प्राची कार्डिले यांचे दमदार संरक्षण यापुढे कर्नाटकचा निभाव लागला नाही. प्राजक्ता चितळकरने उत्कृष्ट आक्रमण केले.

Web Title: Maharashtra's 'Four Roads'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.