महाराष्ट्राच्या महेशची धमाकेदार आगेकूच
By admin | Published: July 14, 2016 08:51 PM2016-07-14T20:51:40+5:302016-07-14T20:51:40+5:30
महाराष्ट्राच्या कसलेल्या महेश माणगावकरने आपल्या लौकिकानुसार आक्रमकक खेळ करताना महाराष्ट्राच्याच अभिषेक प्रधानला सरळ तीन सेटमध्ये नमवून ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय
राष्ट्रीय स्क्वॉश : सौरव, दिपिका, जोश्ना यांचीही अपेक्षित कामगिरी
मुंबई : महाराष्ट्राच्या कसलेल्या महेश माणगावकरने आपल्या लौकिकानुसार आक्रमकक खेळ करताना महाराष्ट्राच्याच अभिषेक प्रधानला सरळ तीन सेटमध्ये नमवून ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. त्याचबरोबर सौरव घोषाल, हरिंदरपाल सिंग संधू, जोश्ना चिन्नप्पा आणि दिपिका पल्लीकल या अव्वल खेळाडूंनीही विजयी आगेकूच केली.
मुंबईतील ओट्टर्स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत महेशने आपला आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ करताना महाराष्ट्राच्याच अभिषेकला स्क्वॉशचे धडे देताना ११-३, ११-९, ११-५ असे नमवले. तसेच अव्वल राष्ट्रीय स्क्वॉशपटू तामिळनाडूच्या सौरवने अपेक्षित विजयासह उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश करताना उत्तर प्रदेशच्या रणजीत सिंगचा ११-३, ११-५, ११-८ असा धुव्वा उडवला.
हरिंदरपाल सिंग संधू याला मात्र विजयी आगेकूच करण्यासाठी दिल्लीच्या गौरव नंदराजोगविरुध्द चांगलेच झुंजावे लागले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत तामिळनाडूच्या हरिंदरपालने ११-३, ११-६, ८-११, ४-११, ११-१ असा विजय मिळवला.
महिलांमध्ये गतविजेती आणि अग्रमानांकीत तामिळनाडूच्या जोश्ना चिनप्पाने शानदार विजयी कूच करताना मचुमा बेगम चौधरीला ११-३, ११-०, ११-० असे पराभूत केले. तर द्वितीय मानांकीत दिपिका पल्लीकलने देखील सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना जम्मू-काश्मिरच्या नितू शर्माला ११-०, ११-१, ११-० असे लोळवले. (क्रीडा प्रतिनिधी)
इतर निकाल : उप - उपांत्यपुर्व फेरी
(पुरुष) :
विजय कुमार (तामिळनाडू) वि.वि. वीर छोत्रानी (महाराष्ट्र) ११-५, ११-२, ११-७; विक्रम मल्होत्रा (महाराष्ट्र) वि.वि. संदीप जांग्रा (दिल्ली) ११-७, ११-३, ११-९; रवी दिक्षित (तामिळनाडू) वि.वि. क्रिश कपुर (पश्चिम बंगाल) १२-१०, ११-६, ११-८; वेलावन सेंथीकुमार (तामिळनाडू) वि.वि. आर्यमान आदिक (महाराष्ट्र) ११-६, ११-८, ९-११, ११-५.
(महिला) :
मयुरी नमसिवायम (तामिळनाडू) वि.वि. नेहा कुमारी (बिहार) ११-१, ११-१, ११-०; ऐश्वर्या खुबचंदानी वि.वि. मनिषा बिस्त (उत्तराखंड) ११-५, ११-२, ११-२; आकांक्षा साळुंखे (गोवा) वि.वि. शिखा कुमारी (बिहार) ११-०, ११-३, ११-०; सचिका इंगळे (उत्तरप्रदेश) वि.वि. हीना मुझफर (जम्मू-काश्मिर) ११-०, ११-३, ११-०; अद्या अडवानी (दिल्ली) वि.वि. श्वेता बुधिया (झारखंड) ११-०, ११-०, ११-१; लक्ष्य रागवेंद्र (तामिळनाडू) वि.वि. सन्नी मेहता (बिहार) ११-०, ११-२, ११-३, अनन्या मोरे वि.वि. सुश्मिता पानिग्रही (गोवा) ११-७, ११-६, ११-८.