महाराष्ट्राचा ओमकार यादव ठरला चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 09:15 PM2018-10-16T21:15:47+5:302018-10-16T21:16:08+5:30
पहिली गोवा ग्रॅण्डमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा : ‘ब’ गटात टायब्रेकरवर मारली बाजी
पणजी : अत्यंत चुरशीच्या झालेल्या ‘ब’ गटात (१९९९ रेटिंग खालील) बाजी मारली ती महाराष्ट्राच्या ओमकार यादव याने. त्याने ९ गुणांसह बरोबरीवर असलेल्या विजय कुमार याचा पराभव केला. १० फेऱ्यांअंती हे दोघेही समान गुणांवर होते. टायब्रेकरवर विजयला पछाडत साताºयाच्या ओमकारने गोव्यातील पहिली गोवा ग्रॅण्डमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा गोवा बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर आयोजित केली होती. या गटात विजय कुमार हा उपविजेता तर राहुल सोरम सिंग हा तिसºया स्थानी राहिला.
विजेत्या ओमकारला १ लाख ४० हजार रुपये व चषक तर उपविजेत्या विजयला १ लाख १५ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला. दहाव्या फेरीत ओमकारने रिषभ निशादचा तर विजयने के . प्रशांतचा पराभव केला. गोव्याचा आघाडीचा खेळाडू अनिरुद्ध भट हा ६.५ गुणांसह ५८ व्या स्थानावर राहिला. त्याला उत्कृष्ट गोमंतकीय खेळाडूचा पुरस्कार प्राप्त झाला. अनिरुद्ध पार्सेकर ७२ व्या तर अन्वेश बांदेकर हा ६ गुणांसह ८८ व्या स्थानी राहिला.
बक्षीस वितरणास नेस्ले ग्रुपचे संजय बांदेकर, उद्योजिका तानिया अलुवालिया, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर, आर्बिट्रेटर अरविंद म्हामल, दत्ताराम पिंगे, बालकृष्णन्, संजय बेलूकर, विश्वास पिळर्णकर, आशिष केणी आणि महेश कांदोळकर उपस्थित होते. गोव्याचा यश मनोज उपाध्ये हा १०९९ इलो गटात उत्कृष्ट खेळाडू ठरला. ११९९ इलो गुणांखालील गटात जुर्गन रॉड्रिग्स, अन्वेश बांदेकरला १३९९ तर इलियास बारेट्टोची बिनमानांकित गटातून उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. या गटात तीन देशांतील एकूण ४३३ खेळाडूंनी भाग घेतला होता.
सॅमवेल आघाडीवर, अभिजित बरोबरीवर समाधान
अर्मेनियाचा ग्रॅण्डमास्टर तेर एस सॅमवेल याने जबरदस्त मुसंडी मारत गोव्यात सुरू असलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ‘अ’ गटात पाचव्या फेरीअंती ५ गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे. त्याने गोव्याचा ग्रॅण्डमास्टर अनुराग म्हामल याचा पराभव केला. इराणचा इदानी पौया आणि युक्रेनचा सियुक विटली हे सुद्धा प्रत्येकी ५ गुणांवर आहे. गोव्याच्या वृत्विज परब याने महाराष्ट्राचा ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे याला बरोबरीवर रोखले. हा स्पर्धेतील लक्षवेधी निकाल ठरला.
ही स्पर्धा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी गोमंतकीय खेळाडूंची कामगिरी मात्र संमिश्र ठरली. चौथ्या फेरीअंती संयुक्त आघाडीवर असलेला अनुराग आता १९ व्या स्थानी घसरला. ऋत्विजपरब याने अभिजितला रोखून कमाल केली. त्याने ५४ चाली रचल्या. या बरोबरीनंतर अभिजित ३.५ गुणांसह १६ व्या स्थानी आहे. अभिजितने आतापर्यंत दोन विजय आणि तीन सामन्यांत बरोबरी साधली आहे. दुसरीकडे, ऋत्विजने यापूर्वी हैदराबाद येथील स्पर्धेत ग्रॅण्डमास्टर दीपन चक्रवर्ती याला बरोबरीवर रोखत अशीच कामगिरी केली होती. तो आता ३.५ गुणांसह ४४ व्या स्थानी आहे.
गोव्याचा महिला ग्रॅण्डमास्टर भक्तीकुलकर्णी हिने कार्तिक साईला बरोबरीवर रोखले. ती ३ गुणांवर आहे. फिडे मास्टर अमेय अवदी याने चौथ्या फेरीत पुनरागमन करीत रामकृष्ण जे याचा पराभव केला. आता तो ३.५ गुणांसह ५५ व्या स्थानी आहे. नीतीश बेलूरकरने सोहम दातारचा पराभव केला. तो ३.५ गुणांवर आहे. नीरज सारीपल्ली, ओम बर्डे, रुबेन कुलासो, उमंग कैसरे, विल्सन क्रुझ, देवेश आनंद नाईक, तन्वी हडकोणकर यांनी सुद्धा विजय नोंदवले. नीरज आणि ओम बर्डे हे प्रत्येकी ३ गुणांवर आहेत.