विश्वजेतेपदासाठी महामुकाबला

By admin | Published: March 28, 2015 11:20 PM2015-03-28T23:20:10+5:302015-03-28T23:20:10+5:30

चार वेळचा ‘चॅम्पियन’ आॅस्ट्रेलिया आणि पहिल्या जेतेपदाची स्वप्ने रंगविणाऱ्या न्यूझीलंड संघात मेलबर्न क्रिकेट मैदानावर रविवारी आयसीसी वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

Mahaubababala for world cup | विश्वजेतेपदासाठी महामुकाबला

विश्वजेतेपदासाठी महामुकाबला

Next

आज अंतिम सामना : चार वेळचा ‘चॅम्पियन’ असलेल्या आॅस्ट्रेलियाला नमविण्याचे न्यूझीलंडसमोर कडवे आव्हान
मेलबोर्न : चार वेळचा ‘चॅम्पियन’ आॅस्ट्रेलिया आणि पहिल्या जेतेपदाची स्वप्ने रंगविणाऱ्या न्यूझीलंड संघात मेलबर्न क्रिकेट मैदानावर रविवारी आयसीसी वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.
११ स्पर्धांपैकी पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक देणाऱ्या न्यूझीलंडपुढे सर्वाधिक वेळा विश्वविजेता झालेल्या तसेच सात वेळा अंतिम फेरीत धडक देणाऱ्या आॅस्ट्रेलियाला नमविण्याचे कडवे आव्हान असेल. मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्याचा अनुभव आॅस्ट्रेलियाकडे आहे; त्याच वेळी न्यूझीलंडला ऐतिहासिक नोंद करण्याची मोठी संधी या सामन्याच्यानिमित्ताने असेल. अनेक दिग्गज खेळाडू घडविणाऱ्या न्यूझीलंड संघाला विश्व क्रिकेटमध्ये अद्याप हवे तसे यश मिळाले नाही. केवळ २००० मध्ये नैरोबी येथे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला नमविले होते. या संघाने पूर्वी सहा वेळा सेमी फायनलमध्ये धडक दिली; पण हा अडथळा पार करण्यात त्यांना दरवेळी अपयश आले होते. रिचर्ड हॅडली, ग्लेन टर्नर, मार्टिन क्रो, स्टीफन फ्लेमिंग यांसारख्या खेळाडूंनी प्रयत्न केले, पण विश्वचषकाने त्यांना हुलकावणी दिली. ब्रेंडन मॅक्युलमच्या संघाकडे मात्र जेतेपद पटकाविण्याची योग्यता आहे. लंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यापासून सलग आठ सामन्यांत विजयी पताका फडकविली आहे. या स्पर्धेत त्यांनी दोन अटीतटीचे सामने जिंकले. आॅस्ट्रेलियाला त्यांनी एका गड्याने तसेच द. आफ्रिकेला चार गड्यांनी नमविले. आॅस्ट्रेलियाचा प्रवासही सोपा नव्हता. न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर बांगला देशविरुद्धचा सामना पावसात वाहून गेला होता. क्वार्टर फायनलमध्ये एकवेळ पाकने आॅस्ट्रेलियाची चांगली दमछाक केली, पण अखेर यजमानांनी बाजी मारलीच. आॅस्ट्रेलियाने नंतर उपांत्य सामन्यात भारताला लोळवून मनोबल उंचावले. कागदावर आॅस्ट्रेलिया प्रबळ
दावेदार मानला जातो. खेळाडूंवर नजर टाकली तरी प्रत्येक विभागात आॅस्ट्रेलियाच सरस दिसतो. त्यांनी सर्व सामने मोठ्या
मैदानावर जिंकले तर न्यूझीलंडला स्वत:च्या देशात लहान मैदानावर सामने जिंकण्याचा अनुभव आहे. उद्याच्या सामन्यात संघाला व्हेट्टोरीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. डावखुऱ्या फिरकीपटूने आतापर्यंत ३.९८ च्या सरासरीने धावा देत ८ सामन्यांत १५ बळी घेतले. याशिवाय ट्रेंट बोल्ट २१ आणि टीम साऊदीने १५ गडी बाद केले आहेत. मॅक्युलमने आक्रमकतेच्या बळावर स्टार्क व हेजलवूडचा अडथळा पार केल्यास आॅस्ट्रेलियाला स्वत:चे डावपेच बदलण्यास बाध्य व्हावे लागेल.

दोन्ही कर्णधारावर
मोठी जबाबदारी
मोठ्या सामन्यात कर्णधाराकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. १९७५ मध्ये क्लाईव्ह लॉईड, १९९२ इम्रान खान, २००३ रिकी पाँटिंग आणि २०११ मध्ये एम. एस. धोनी यांनी जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका वठविली आहे. मॅक्युलम तसेच क्लार्कसाठीही उद्याचा दिवस निर्णायक असेल.

कोण
पालटू

शकतो

चित्र...
आॅस्ट्रेलियासाठी युवा फलंदाज स्टीव्हन स्मिथ सामन्याचे चित्र पालटू शकतो. भारताविरुद्ध उपांत्य लढतीतील शतकासह त्याने सात सामन्यांत ३४६ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत तो संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. न्यूझीलंडच्या जमेची बाजू अशी, की त्यांचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम हा प्रतिस्पर्धी कर्णधार मायकेल क्लार्कच्या तुलनेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण त्याला उद्या मोठी खेळी करावी लागेल.

विंडीजविरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये नाबाद द्विशतक झळकविणारा मार्टिन गुप्तिल याची कर्णधाराला साथ लाभू शकते. त्याच्या ५३२ धावा आहेत. न्यूझीलंडकडे ग्रांट इलियट आणि कोरी अ‍ॅण्डरसनसारखे अष्टपैलू खेळाडू आहेतच. इलियटने उपांत्य सामना जिंकून दिला होता. अ‍ॅण्डरसन ताकदवान फटकेबाजीसाठी ओळखला जातो.

आॅस्ट्रेलियाकडे स्टार खेळाडूंचा भरणा आहे. सलामीचा डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरॉन फिंच हे फायनलवर मोहोर उमटवू इच्छितात. ग्लेन मॅक्सवेल आणखी तुफानी खेळी करण्यास उत्सुक आहे. एमसीजीवर यजमान संघाचे पारडे जरी जड राहिले तरी न्यूझीलंडला कमकुवत मानण्याची चूक ते करणार नाहीत.

1992
मधील मेलबर्न मैदानावर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना झाला होता. हा सामना पाकिस्तानने २२ धावांनी जिंकला. आॅस्ट्रेलियाच्या इतिहासातील हे सर्वात जुने स्टेडियम.

मेलबर्न क्रिकेट स्टेडियम!
आॅस्ट्रेलियातील जगप्रसिद्ध या स्टेडियमवर रविवारी इतिहास रचला जाईल. ११ व्या विश्वचषकातील मेगाफायनल याच मैदानावर रंगणार आहे. विश्वचषकातील यजमानपदाचे हे दुसरे मैदान.

15/11/1838
रोजी मेलबर्न क्रिकेट क्लबने
या मैदानाची बांधणी केली होती.

1956रोजी याच मैदानावर आॅलिम्पिक सामनेही खेळविण्यात आले होते. सध्या या मैदानाची प्रेक्षक क्षमता एक लाख २४ इतकी आहे.
1971-72 मध्ये वेस्टइंडिजच्या महान फलंदाज गार्फिल्ड सोबर्सने दुसऱ्या डावात २५४ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. या खेळीचे डॉन ब्रॅडमन यांनी सर्वाेत्कृष्ठ खेळी म्हणून वर्णन केले होते.

क्लार्क उद्या निवृत्ती घेणार !
विश्वविजेतेपदाचा अंतिम सामना खेळल्यानंतर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क वन डेतून निवृत्त होणार आहे. ही योग्य वेळ असून नवा कर्णधार शोधण्यास पुरेसा वेळ मिळेल, असे क्लार्कने म्हटले आहे. चार दिवसांनतर ३५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या क्लार्कने २४४ वन डे खेळले. त्यात ८ शतके व ५७ अर्धशतकांची नोंद केली. त्याच्या ७९०७ धावा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र तो खेळत राहील.
तो म्हणाला, ‘मी सहकारी आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी बोललो. उद्या २४५ वा सामना अखेरचा असेल, असे सांगितले. देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे.’ क्लार्कचा वन डे रेकॉर्ड चांगला आहे, पण भारताविरुद्ध तो नेहमी अपयशी ठरला. टीम इंडियाविरुद्ध ३१ सामन्यांत दोन शतकांसह ८५८ धावा आहेत.
त्याने नेतृत्वात ७३ पैकी ४९ सामने जिंकून दिले. याशिवाय १०८ कसोटींत २८ शतके आणि २७ अर्धशतकांसह ८४३२ धावा त्याच्या नावावर आहेत. अलीकडे चार महिने तो जखमांनी त्रस्त होता. भारताविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यानंतर त्याला सर्जरी करून घ्यावी लागली.
विश्वचषकातील सहभागावर प्रश्नचिन्ह लागले होते. पण निवडकर्त्यांनी फिटनेस चाचणीनंतर स्थान दिले. क्लार्कचा उत्तराधिकारी म्हणून स्टीव्हन स्मिथकडे पाहिले जाते.

आधी
संघाचे हित
-क्लार्क
माझे सहकारी माझ्याबाबत काय विचार करतात, ही माझी सर्वात मोठी मिळकत आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर कुठल्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात सर्वात आधी संघाचे हित जोपासले. दिवंगत फिल ह्यूज असता तर अधिक बरे वाटले असते. सहकाऱ्यांचा विश्वास संपादन केल्याचे मला समाधान आहे.

विजयाची
समान संधी - मॅक्युलम
अंतिम सामना जिंकण्याची आम्हाला समान
संधी असेल. जीवनातील अविस्मरणीय क्षण व मोठ्या मैदानाचा आनंद लुटणार आहोत. देशाबाहेर पहिल्यांदा खेळत असल्याचा तसेच आकाराने मोठ्या असलेल्या मैदानाचा कुठलाही दबाव नाही. जगभरातील मैदानांवर खेळण्याचा अनुभव येथे पणाला लावणार आहोत. काहीही अशक्य नाही, या जुन्या म्हणीनुसार ताकदीनिशी खेळून सामना खेचून आणू.

भारतीयांचा हवा पाठिंबा!
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय चाहत्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. फायनलच्या प्रत्येक चेंडूवर न्यूझीलंडसाठी टाळ्या वाजवा. भारतीय चाहत्यांना विश्वचषक जिंकण्याची भूक आहे. मोठ्या सामन्यात तुमचा पाठिंबा मिळाल्यास आम्हाला विश्वचषक जिंकणे सोपे जाईल.

यजमान यांच्यात रंगणाऱ्या अंतिम सामन्यासाठी अमेरीकेच्या टोनी गोर्डेन यांनी खेळपट्टी बनवली आहे. ३९ वर्षीय टोनी यांनी ही खेळपट्टी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. मैदानावरील २२ यार्ड्सवर खास रिव्हर गम्सचा वापर ्रकरण्यात आला आहे. कुंपनापासून पाच मीटर अंतरावर ठेवून सीमारेषा आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असेल त्यामुळे तीनशे किंवा त्याहून अधिक धावसंख्या पाहायला मिळेल.

आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे दोन्ही संघ मेलबर्न क्रिकेट मैदानावर एकदिवसीय क्रिकेट लढतीत १९ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये आॅस्ट्रेलियाने १४ वेळा व न्यूझीलंडने ४ वेळा विजय नोंदविला आहे. एका लढतीचा निकाल लागू शकला नाही.

 

Web Title: Mahaubababala for world cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.