महेंद्रसिंह धोनी बनला पुणेकर

By Admin | Published: December 16, 2015 03:42 AM2015-12-16T03:42:40+5:302015-12-16T03:42:40+5:30

खेळाडूंना निवडण्याची मिळालेली प्रथम संधी साधताना आयपीएलमधील नवख्या पुणे संघाने अपेक्षेप्रमाणे भारताचा एकदिवसीय व टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपल्या चमूत सामील

Mahendra Singh Dhoni became Puneer | महेंद्रसिंह धोनी बनला पुणेकर

महेंद्रसिंह धोनी बनला पुणेकर

googlenewsNext

मुंबई : खेळाडूंना निवडण्याची मिळालेली प्रथम संधी साधताना आयपीएलमधील नवख्या पुणे संघाने अपेक्षेप्रमाणे भारताचा एकदिवसीय व टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपल्या चमूत सामील करून घेतले. त्याचवेळी आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून चेन्नई सुपर किंग्ज संघासह जोडलेला आणि संघाकडून प्रत्येक सामना खेळणाऱ्या सुरेश रैनाची वर्णी राजकोट संघात लागली. यामुळे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये धोनी आणि रैना विरुद्ध संघातून खेळताना दिसतील. या दोन्ही खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी पुणे व राजकोट संघाला प्रत्येकी १२ करोड ५० लाख रुपयांची किंमत मोजावी लागली.
आयपीएलमधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघाच्या अनुक्रमे सात व तीन खेळाडूंची निवड झाली. खेळाडू निवडण्याची प्रथम संधी मिळालेल्या पुणे संघाने मालक संजीव गोयंका यांनी अपेक्षेप्रमाणे धोनीला निवडल्यानंतर राजकोटने रैनाला प्राधान्य दिले. यानंतर सध्या टीम इंडियाचा फॉर्ममध्ये असलेला आणि राजस्थान रॉयल्सचा हुकमी फलंदाज अजिंक्य रहाणेची निवड पुण्याने केली. तर राजकोटने आपली दुसरी पसंती अष्टपैलू रवींद्र जडेजाला दिली. या दोन्ही खेळाडूंना प्रतिवर्ष प्रत्येकी ९ करोड ५० लाख रुपये मिळतील.
पुण्याने आपल्या तिसऱ्या संधीमध्ये भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन आश्विनची निवड केली. तर राजकोटने न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ब्रँडन मॅक्युलमला आपल्या टीममध्ये घेतले. तर चौथ्या संधीमध्ये दोन्ही संघांनी आॅस्टे्रलियाच्या खेळाडूंची निवड करताना पुण्याने स्टीव्हन स्मिथ तर राजकोटने जेम्स फॉकनरला पसंती दिली. तसेच अखेरच्या निवडीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो यांची अनुक्रमे पुणे व राजकोट संघात वर्णी लागली. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) इमारतीमध्ये झालेल्या या ड्राफ्ट पूलमध्ये चेन्नई व राजस्थान संघाचे निलंबन झालेले असल्याने केवळ या दोन संघाच्या खेळाडूंचा समावेश होता. त्याचप्रमाणे ज्या खेळाडूंची मंगळवारी निवड झाली नाही ते खेळाडू सहा फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएलच्या लिलावामध्ये सहभागी होतील. या ड्राफ्ट प्रक्रियेमध्ये दोन्ही संघाचे मिळून एकूण ५० खेळाडूंचा समावेश होता.
(क्रीडा प्रतिनिधी)
ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी जुन्या संघासह केलेल्या करारानुसार खेळाडूंची कमाई सुरक्षित राहील, अशी माहिती दिली. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने सांगितले, की खेळाडूंच्या कमाई विषयीची माहिती ३१ डिसेंबरला पहिली टे्रडिंग विंडो बंद झाल्यानंतर संकेतस्थळावर पाहण्यास मिळेल. दोन्ही संघांनी मंगळवारी प्लेअर्स ड्राफ्टमध्ये प्रत्येकी ३९ करोड रुपये खर्च केले असून त्यांच्याकडे आता प्रत्येकी २७ करोड रुपये शिल्लक राहिले आहेत.
(क्रीडा प्रतिनिधी)

निवड झालेले खेळाडू :
पुणे फ्रँचाइसी : महेंद्रसिंह धोनी, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन, स्टीव्हन स्मिथ आणि फाफ डू प्लेसिस.
राजकोट फ्रँचाइसी : सुरेश रैना (१२ कोटी ५० लाख), रवींद्र जडेजा (९ कोटी ५० लाख), ब्रँडन मॅक्युलम (७ कोटी ५० लाख), जेम्स फॉल्कनर (५ कोटी ५० लाख) आणि ड्वेन ब्राव्हो (४ कोटी).

सलामीचा व अंतिम सामना मुंबईत
आयपीएलच्या नवव्या सत्राविषयी माहिती देताना शुक्ला म्हणाले, की स्पर्धेचा सलामीचा व अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येईल. तसेच पहिली टे्रडींग विंडो १५ ते ३१ डिसेंबर, दुसरी टे्रडींग विंडो ११ ते २२ जानेवारी २०१६ दरम्यान आणि तिसरी व अंतिम टे्रडींग विंडो ८ ते १९ फेब्रुवारी दरम्यान (लिलाव झाल्यानंतर) खुले होतील. त्याचप्रमाणे १३ आणि १४ जानेवारीला श्रीनगर येथे सर्व फ्रेंचाईजीची कार्यशाळा घेण्यात येईल.

आयपीएल २०१३मध्ये स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपांमुळे चेन्नई आणि राजस्थान या संघांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. यामुळे यंदा ड्राफ्ट प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला. दोन्ही संघांवरील निलंबनाची कारवाई सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त निवृत्त न्यायाधीश आर. एम. लोढा समितीद्वारे करण्यात आली होती.

पाक खेळाडूंविषयी चर्चा होणार..
या वेळी राजीव शुक्ला यांनी आयपीएलमधील पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागाबाबतची भूमिकाही स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, की पाकिस्तानच्या खेळाडूंचा आयपीएलमधील सहभाग आणि भारत-पाक द्विपक्षीय मालिक हे दोन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यांच्या आयपीएल सहभागाविषयी आम्ही फ्रँचाइसीसह चर्चा करुरू. तसेच भारत-पाक मालिकेबाबत म्हणाल, तर अजूनही परिस्थितीत बदल नाही. आम्हाला केंद्र सरकारकडून कोणतीही सूचना मिळालेली नाही.

स्टीव्हन स्मिथ
२०१४-१५ दरम्यान राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याला २४ सामन्यांत एकदाही फलंदाजी करण्यास संधी मिळाली नाही. त्याने क्षेत्ररक्षण करताना १६ झेल घेतले आहेत.

महेंद्रसिंह धोनी
चेन्नई सुपर किंग्जकडून २००८-१५ दरम्यान खेळताना १२९ सामन्यांत ११६ डावांत २९८६ धावा केल्या आहेत. तो ४० वेळा नाबाद राहिला आहे. त्याची सर्वाेच्च खेळी नाबाद ७० आहे. त्याने १५ अर्धशतके केली आहेत. यामध्ये २१८ चौकार व १२६ षटकार ठोकले आहेत.

फाफ डु प्लेसीस
२०१२-१५ दरम्यान ४५ सामन्यांत ३९ डावांत १०८१ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाेच्च धावसंख्या ७३ आहे. त्याने ६ अर्धशतके केली असून ५२ चौकार व २९ षटकार ठोकले आहेत.

आर. आश्विन
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना २००८-१५ दरम्यान ९७ सामन्यांत १३१ सामन्यात १९० धावा केल्या आहेत. त्याची सर्वाेच्च धावसंख्या २३ आहे. ११ वेळा तो नाबाद राहिला आहे. त्याने ७४ डावांत २१८० धावा देवून ९० विकेट घेतल्या आहेत. १६ धावांत ३ विकेट ही त्याची सर्वाेच्च कामगिरी आहे. त्याने २० झेल सुद्धा घेतले आहेत.

अजिंक्य रहाणे
राजस्थान रॉयल्सकडून २०११-१५ दरम्यान ७१ सामन्यांत ६६ डावांत २०४७ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाेच्च धावसंख्या नाबाद १०३ असून ९ वेळा तो नाबाद राहिला आहे. त्याने १५ अर्धशतके केली असून २१८ चौकार व ३९ षटकार मारले आहेत.

आम्ही जे ठरविले होते ते साध्य केले. आम्ही सुरुवातीपासूनच धोनीला संघात घेण्याचा निर्धार केलेला. आमचा संघ नवीन असून आम्ही ब्रँड बनवू इच्छितो आणि त्यासाठी धोनीहून अधिक चांगला पर्याय कोणताच नाही. आम्ही आठ खेळाडूंवर लक्ष ठेवले होते. त्यात ज्या खेळाडूंना अधिक प्राधान्य दिले होते ते आम्ही मिळविले आहेत. तसेच, आम्ही मनोज तिवारी आणि अशोक दिंडा यांचा या बाबतीत सल्ला घेतला होता. संघाच्या प्रशिक्षकपदासाठीही आम्ही दोन उमेदवारांशी चर्चा करीत आहोत. आयपीएल संचालन परिषदचे सदस्य असल्याने सौरभ गांगुली या प्रक्रियेमध्ये सहभागी नव्हते. तसेच, ते सध्या आयएसएलमध्ये व्यस्त आहेत.
- सुब्रतो तालुकदार, पुणे संघ प्रतिनिधी

धोनीला संघात घेणे अशक्य असल्याची
जाणीव असल्याने आम्ही सुरेश रैनावर अधिक लक्ष दिले. तो धोनीनंतरचा सर्वांत मजबूत दावेदार होता. राजकोटच्या खेळपट्टीवर आम्हाला आक्रमक फलंदाज व दमदार गोलंदाजांची गरज होती. त्यानुसार आम्हाला संतुलित संघाची अपेक्षा आहे. संघ नवीन आहे आणि प्रतिस्पर्धी संघांना मागील ८ सत्रांचा दांडगा अनुभव आहे. आम्ही त्यांच्या चुकांपासून धडा घेऊ. लवकरच संघाच्या कर्णधाराची घोषणा करण्यात येईल.
- केशव बन्सल,
राजकोट संघ प्रतिनिधी

Web Title: Mahendra Singh Dhoni became Puneer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.