महेंद्रसिंह धोनी कर्णधारपदासाठी योग्यच
By Admin | Published: June 23, 2015 01:38 AM2015-06-23T01:38:19+5:302015-06-23T01:38:19+5:30
बांगलादेशचा नवोदित युवा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या गोलंदाजीचा सामना करण्यात फलंदाज अपयशी ठरल्याने भारताचा पराभव झाला आहे
पुणे : बांगलादेशचा नवोदित युवा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याच्या गोलंदाजीचा सामना करण्यात फलंदाज अपयशी ठरल्याने भारताचा पराभव झाला आहे. इतिहास पाहता अनेक नवोदित गोलंदाजांनी पदार्पणात उत्कृष्ट फलंदाजांनाही चकविलेले आहे. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पराभवासाठी दोषी धरु नये, त्यानेच कर्णधारपदाची धुरा सांभाळली पाहिजे अशी जोरदार पाठराखण भारतीय संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे यांनी केली आहे. तसेच धोनीने कधीही कर्णधारपद सोडण्याचे म्हटले नसताना माध्यमांनीच तसा दावा केल्याचेही बोर्डे म्हणाले.
भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे भारतावर मालिका गमाविण्याची नामुष्की ओढावली आहे. या सामन्यानंतर धोनीने पत्रकारांशी बोलताना अप्रत्यक्षरित्या कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले होते. मला कर्णधारपदावरुन हटविल्याने भारतीय क्रिकेटचे चांगले होणार असेल तर मी एक खेळाडू म्हणून खेळण्यास तयार आहे. भारतीय संघात काही चुकीचे झाले की त्याला मीच जबाबदार असतो अशी निराशाजनक प्रतिक्रिया देखील त्याने दिली होती.
त्या पार्श्वभूमीवर बोलताना बोर्डे म्हणाले, बांगला देशाचा युवा गोलंदाज मुस्तफिजुरच्या गोलंदाजीत विविधता होती. त्याने दोन सामन्यांत घेतलेल्या ११ बळींसाठी त्याचे कौतुक करायला हवे. मात्र त्याचा सामना करण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. क्रिकेटचा इतिहास पाहता शेन वॉर्न, अजंता मेंडिस या सारख्या काही गोलंदाजांनी देखील सुरुवातीला भल्या भल्या फलंदाजांना चकवा दिला होता. त्या उलट धोनी एक संयमी व चांगला कर्णधार आहे. एक मालिका गमावल्यावर त्याला नाकारणे चुकीचे आहे.