महेंद्रसिंह धोनीला दिलासा
By admin | Published: September 6, 2016 01:48 AM2016-09-06T01:48:44+5:302016-09-06T01:48:44+5:30
स्वत:ला ईश्वराच्या रूपात सादर करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मेहेंद्रसिंह धोनीवर दाखल करण्यात आलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निकाली काढले.
नवी दिल्ली : एका नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर स्वत:ला ईश्वराच्या रूपात सादर करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मेहेंद्रसिंह धोनीवर दाखल करण्यात आलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निकाली काढले.
न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठाने धोनीला दिलासा देताना म्हटले, की कर्नाटकाच्या न्यायालयाने कायदेशिर प्रक्रियेचे पालन न करता या क्रिकेटपटूला नोटिस बजावण्याची चूक केली.
पीठाने म्हटले, की ‘आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करताना हे प्रकरण खारीज करीत आहोत. त्यात आरोपीला समन्स पाठविण्याच्या आदेशाचाही समावेश आहे. आम्ही आदेश पारीत करताना तक्रार आणि कथित गुन्ह्याचा विचार केला आहे.’
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १४ सप्टेंबर रोजी धोनीविरुद्ध गुन्हेगार म्हणून कारवाई करण्याला स्थगिती दिली होती. धोनीविरुद्ध एका नियातकालिकाच्या मुखपृष्ठावर कथित प्रकरणी स्वत:ला भगवान विष्णूच्या रूपात सादर केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती.
न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने धोनीविरुद्ध गुन्ह्याची कारवाई स्थगित करण्यास नकार दिला होता. धोनीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
देताना विशेष याचिका दाखल केली होती.
सामाजिक कार्यकर्ते जयकुमार हिरमथ यांनी याचिका दाखल करताना धोनीवर आरोप केला होता, की एका नियातकालिकाच्या मुखपृष्ठावर त्याला भगवान विष्णूंच्या रूपात दाखविण्यात आले आहे. त्याच्या हातात अनेक वस्तू दाखविण्यात आल्यात असून, त्यात बुटाचाही समावेश आहे. तक्रारीची दखल घेतलाना अतिरिक्त मुख्य मट्रोपोलिटन मॅजिस्टेटने धोनीविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम २९५ नुसार धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि कलम ३४ (हेतुपुरस्सर) गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानंतर धोनी न्यायालयात उपस्थित न झाल्यामुळे मॅजिस्टेटने धोनीविरुद्ध समन्स बजावले होते. त्याविरुद्ध धोनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. (वृत्तसंस्था)