महेंद्रसिंग धोनीने सोडले कर्णधारपद

By Admin | Published: January 5, 2017 02:29 AM2017-01-05T02:29:37+5:302017-01-05T02:29:37+5:30

महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री तडकाफडकी भारतीय वन डे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

Mahendra Singh Dhoni's captaincy left | महेंद्रसिंग धोनीने सोडले कर्णधारपद

महेंद्रसिंग धोनीने सोडले कर्णधारपद

googlenewsNext

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री तडकाफडकी भारतीय वन डे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. खेळाडू या नात्याने आपण संघात कायम राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. माहीने नेतृत्व सोडल्याने विराट कोहली याच्याकडेच वन डे आणि टी-२० संघाचे देखील नेतृत्व सोपविले जाईल, असे वृत्त आहे.
नेतृत्व सोडण्याची इच्छा जाहीर करीत १५ जानेवारीपासून इंग्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या वन डे तसेच टी-२० मालिकेत खेळण्यासाठी उपलब्ध राहणार असल्याचे माहीने कळविले आहे. यावर प्रतिक्रिया देत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी म्हणाले, ‘प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटमधील धोनीचे योगदान अनन्यसाधारण आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याचे कर्तृत्व कायम स्मरणात राहील.’
दोन वर्षांपूर्वी आॅस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटला अलविदा करणाऱ्या धोनीने वन डे तसेच टी-२०मध्ये भारताला शिखरावर पोहोचविले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तर, २०१५ च्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली होती.

चार दिवस नागपूरमध्ये धोनीचा होता मुक्काम...
गृहराज्य असलेल्या झारखंड रणजी संघाचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनी सध्या नागपुरात आहे. व्हीसीएच्या सिव्हील लाईन्सस्थित स्टेडियममध्ये बुधवारी त्याचा संघ गुजरातकडून चौथ्याच दिवशी पराभूत झाला. धोनी चारही दिवस मैदानावर हजर राहून खेळाडूंना मार्गदर्शन करीत होता. या दरम्यान निवड समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशी एमएसने बराचवेळ हितगूज केले. दोघेही सारखे बोलण्यात व्यस्त होते. रात्री अचानक धोनीने राजीनाम्याची घोषणा करताच तर्कविर्तक सुरू झाले.


भारतीय संघ निवडीसाठी बैठक
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उद्भवलेल्या प्रशासकीय संकटानंतरही इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी शुक्रवारी निवड समितीची बैठक होत आहे.
१५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या या मालिकेसाठी मुंबईत एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समिती संघ निवड करणार असल्याचे बीसीसीआयने बुधवारी जाहीर केले. सीसीआयवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन सराव सामन्यांसाठी देखील भारत अ संघाची निवड समिती करणार आहे.

धोनी ‘कॅप्टन्सी’
२००७ साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या टी२० विश्वचषकावर कब्जा केला.
२०११ साली धोनीने भारताला ५० षटकांचा आयसीसी विश्वचषक मिळवून दिला.
२०१३ साली भारताने धोनीच्या नेतृत्वामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली.
२००९ साली भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला.
टी२० विश्वचषक, आयसीसी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा धोनी क्रिकेटविश्वातील एकमेव कर्णधार.

Web Title: Mahendra Singh Dhoni's captaincy left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.