कौतुकास्पद! पेंटिंगचं काम करून जवानानं भावाला बनवलं खो-खो स्टार; नागपूरमधील भावांची यशोगाथा

By ओमकार संकपाळ | Published: December 29, 2023 06:20 PM2023-12-29T18:20:38+5:302023-12-29T18:21:43+5:30

राज्यातील ग्रामीण भागातील तरूणांचा मोठ्या प्रमाणातील कल हा सैन्य भरतीकडे असतो.

Mahesh Mahajan, an Indian jawan from Nagpur, made his younger brother KOMAL MALHARRAO MAHAJAN a Kho Kho star, read here details  | कौतुकास्पद! पेंटिंगचं काम करून जवानानं भावाला बनवलं खो-खो स्टार; नागपूरमधील भावांची यशोगाथा

कौतुकास्पद! पेंटिंगचं काम करून जवानानं भावाला बनवलं खो-खो स्टार; नागपूरमधील भावांची यशोगाथा

जिद्द आणि मेहनत चांगली असेल तर कोणत्याच आव्हानाचा टिकाव लागत नाही... याचा प्रत्यय देणारी अनेक उदाहरणं समाजात आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील तरूणांचा मोठ्या प्रमाणातील कल हा सैन्य भरतीकडे असतो. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बहुतांश तरूण सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी ते सराव करायला सुरूवात करतात. पण, नागपूर येथील महेश महाजन या भारतीय जवानानं स्वत:चं स्वप्न पूर्ण करण्याबरोबर त्याच्या लहान भावाला देखील त्याच्या स्वप्नाकडे कूच करण्यासाठी विशेष सहकार्य केलं. नागपूर जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील कोमल मल्हारराव महाजन या १८ वर्षीय तरूणानं परिस्थितीला मात करत गरूडझेप घेतली. त्यानं इयत्ता तिसरीत असल्यापासून खो खो खेळायला सुरुवात केली अन् या खेळानं त्याला एक नवीन ओळख दिली. अष्टपैलू कोमलनं 'लोकमत'शी बोलताना त्याचा इथपर्यंतचा संघर्षमय प्रवास सांगितला आहे.
 
कोमलचा मोठा भाऊ महेश हा सध्या भारतीय सैन्य दलात सेवा देत आहे. मोठा भाऊ भरतीचा सराव करण्यासाठी मैदानात जात असे... तेव्हा कोमलही त्याच्यासोबत जात अन् साहसी खेळ आणि व्यायामात गुंतून जायचा. अल्टीमेट खो खो मध्ये मुंबई खिलाडी संघाकडून खेळणाऱ्या कोमलने 'लोकमत' शी बोलताना सांगितले की, मोठ्या भावाकडूनच मला खो खो खेळायची प्रेरणा मिळाली. माझ्या यशाचं सर्व श्रेय माझ्या मोठ्या भावाचं आहे. तसेच आई-वडिलांनी देखील मोलाची साथ दिली. वेळोवेळी मोठा भाव माझ्यासाठी धावून आला... प्रसंगी त्यानं पेटिंगच्या दुकानात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मला काय कमी पडू नये याची तो नेहमी काळजी घ्यायचा. मोठ्या भावानं वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं शिवाय मलाही एका नव्या उंचीवर नेले.

प्रशिक्षकांकडून आर्थिक मदत 
कोमलची आर्थिक परिस्थिती बिकट होती. अशा स्थितीत खो खोचा सराव, त्यासाठी लागणारे साहित्य, या सगळ्या बाबींसाठी त्याचे प्रशिक्षक उल्हास काटकर देवदूत बनले. कोमल सांगतो की, काटकर सरांनी त्याला सर्वाधिक मदत केली. ते चांगल्या पद्धतीने सराव घेत असत... त्यामुळेच मला आज इथे खेळण्याची संधी मिळत आहे. त्यांनी मला अनेकदा आर्थिक मदत केली त्यामुळे माझ्या यशात त्यांचाही खारीचा वाटा आहे. आज मला नवीन ओळख मिळाली आहे, नातेवाईक जेव्हा टीव्हीवर पाहतात अन् मला सांगतात... तेव्हा खूप अभिमान वाटतो. 

१९ व्या वर्षी सैन्य दलात भरती...
कोमलचा मोठा भाऊ आता भारतीय सैन्य दलात आहे. तो वयाच्या १९व्या वर्षी भरती झाला. घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यानं उन्हाळ्याच्या दिवसात दुकानात दिवस काढले. तो तिथेच काम करायचा. भरती होण्यापूर्वी पेंटिंगचं काम करून त्यानं घरची आर्थिक बाजू सांभाळली. घरी कोणती वस्तू कमी पडू नये याची तो नेहमी काळजी घ्यायचा. तो मला देखील आजपर्यंत आर्थिक मदत करत आला आहे, असे कोमलनं सांगितलंं. 

कोमल त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या मोठ्या भावाला आणि आई-वडिलांना देतो. पण, त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रशिक्षक उल्हास काटकर यांनी त्याला खो-खो खेळाच्या मूलभूत गोष्टी शिकवल्या आणि या प्रवासात आर्थिक मदत केली. शेतकरी कुटुंबातून आलेल्या कोमलच्या कुटुंबाला खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला पण त्याच्या भावाने मेहनत घेऊन भावाचेही स्वप्न पूर्ण केलं. दरम्यान, कोमल २ सबज्युनियर आणि ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत खेळला आहे. तसेच खेलो इंडिया गेममध्येही त्याचा सहभाग आहे.
 
शेतकऱ्याच्या लेकाची गरूडझेप 
खो-खो खेळण्यासाठी आई-वडिलांनी परवानगी कशी दिली? यावर कोमलनं म्हटलं, "मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगा असून ग्रामीण भागात खेळाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं... हा खेळ करिअर घडवेल का अशी शंका मनात असते. परंतु, माझे आई-वडील याला अपवाद ठरले आणि त्यांनी मला खूप पाठिंबा दिला. मी कधी मैदानात गेलो नाही तर ते आवर्जून सरावासाठी जा असं सांगायचे. घरी थांबून काय करणार आहेस, अशी तंबी देखील ऐकायला मिळायची. खो-खो हा साहसी तसेच डोक्याचा खेळ आहे. रणनीती आखावी लागते. या खेळात पुढे जाण्यासाठी गती फार महत्त्वाची आहे."

Web Title: Mahesh Mahajan, an Indian jawan from Nagpur, made his younger brother KOMAL MALHARRAO MAHAJAN a Kho Kho star, read here details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.