सर्वोत्तम खेळ करणे प्रमुख लक्ष्य
By admin | Published: April 6, 2016 04:37 AM2016-04-06T04:37:09+5:302016-04-06T04:37:09+5:30
टीम इंडियाचा प्रशिक्षक परदेशी असावा की देशी हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. माझे काम संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आहे
मुंबई : टीम इंडियाचा प्रशिक्षक परदेशी असावा की देशी हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. माझे काम संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आहे आणि मी त्यासाठी कायम प्रयत्न करीत राहणार. प्रशिक्षक नेमणे हे बीसीसीआयचे काम आहे. त्यांनी नेमून दिलेल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मी खेळणार, असे मत भारताचा आघाडीचा फलंदाज सुरेश रैना याने व्यक्त केले.
लोअर परेल येथे झालेल्या एका कार्यक्रमात रैनाने आपले मत व्यक्त केले. नुकताच झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत संघाने चांगली कामगिरी केल्याचे सांगतानाच त्याने विजेत्या वेस्ट इंडिज संघाचेही अभिनंदन केले. आगामी आयपीएलमध्ये रैना गुजरात लायन्सचे नेतृत्त्व करणार आहे. याविषयी तो म्हणाला, ‘‘आयपीएलचे यंदाचे सत्र माझ्यासाठी आव्हानात्मक असेल. आठवर्ष एकाच संघात राहिल्यानंतर आता दुसऱ्या संघातून खेळताना जुन्या घरातून नव्या घरी राहण्यास जाण्यासारखे आहे. अगोदरच्या संघातील सिनियर खेळाडूंकडून मी खूप काही शिकलो असून त्याचा मला निश्चितच चांगला फायदा होईल.’’
स्पर्धेत पहिल्यांदाच महेंद्रसिंग धोनी विरुद्ध खेळण्याचा अनुभव कसा असेल, या प्रश्नावर रैना गंमतीत म्हणाला, ‘‘आधीच्या संघातील बहुतेक खेळाडू माझ्या संघात असून आम्ही धोनीविरुध्द नाही, तर धोनी आमच्या विरुद्ध खेळेल.’’ तसेच, ‘‘आम्ही केवळ धोनी विरुद्ध रणनिती आखलेली नाही. स्पर्धेतील सर्वच संघ तगडे असून प्रत्येकाविरुद्ध वेगळी रणनिती आखावी लागेल. ही स्पर्धा नवोदितांसाठी सुवर्णसंधी असून प्रत्येकासाठीच आव्हानात्मक असेल,’’ असेही रैना म्हणाला.
आपल्या गुजरात संघाविषयी रैनाने सांगितले, ‘‘आमच्या संघात अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. विशेष म्हणजे ड्वेन ब्रावो संघात असल्याचा आनंद आहे. (क्रीडा प्रतिनिधी)