‘देशहितासाठी योग्य निर्णय घ्यावा’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 04:36 AM2019-10-19T04:36:50+5:302019-10-19T04:37:32+5:30
विश्व स्पर्धेत मेरीकोमला ५१ किलो गटात कांस्यवर समाधान मानावे लागले
नवी दिल्ली : ‘मी बॉक्सिंग महासंघाला देश खेळ आणि खेळाडूंच्या हितार्थ सर्वोत्कृष्ट निर्णय घेण्यास सांगणार आहे. मंत्री हे क्रीडा महासंघाद्वारा होणाऱ्या खेळाडू निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करीत नाहीत कारण क्रीडा महासंघ आॅलिम्पिक चार्र्टनुसार स्वायत्त आहेत,’ असे क्रीडामंत्री कीरेन रिजिजू यांनी बॉक्सर निकहत झरीनच्या पत्राला उत्तर दिले.
आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेआधी भारतीय संघाची निवड करताना दिग्गज मेरीकोमविरुद्ध निवड चाचणी घ्यावी, अशी मागणी निकहतने गुरुवारी क्रीडामंत्री रिजिजू यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
या पत्राला उत्तर देताना रिजिजू म्हणाले की, ‘मी निश्चितच बॉक्सिंग महासंघाला देश, खेळाडू व खेळाच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यास सांगेन.’ दरम्यान मेरीकोमने याआधीच मी बीएफआयच्या सुचनेनुसार खेळेल, असे स्पष्ट केले होते. विश्व स्पर्धेत मेरीकोमला ५१ किलो गटात कांस्यवर समाधान मानावे लागले. या स्पर्धेसाठी संघाची निवड करत मेरीकोमची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) तिला निवड चाचणीत न खेळवता थेट भारतीय संघात निवडले होते.
निकहतने मानले आभार
झरीनला विश्व स्पर्धेसाठी चाचणीची संधी नाकारण्यात आली. बीएफआयने त्यावेळी इंडिया ओपन आणि प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण जिंकणाºया मेरीकोमची निवड केली होती. रिजिजू यांच्या वक्तव्यावर निकहत म्हणाली,‘ मला निष्पक्ष संधी मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्ही ताबडतोब दखल घेतल्याबद्दल आभार. देशाचा सन्मान वाढविण्यासाठी अहोरात्र घाम गाळणाºया खेळाडूंसोबत पक्षपात आणि दुजाभाव होणार नाही, अशी अपेक्षा आहे. निकहतला आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यानेदेखील पाठिंबा दर्शविला आहे.