भारतासाठी ‘करा किंवा मरा’
By admin | Published: January 17, 2016 03:26 AM2016-01-17T03:26:43+5:302016-01-17T03:26:43+5:30
पहिल्या दोन्ही लढतींत गोलंदाजांच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेल्या भारतीय संघावर आज रविवारी तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याचे दडपण असेल.
मेलबोर्न : पहिल्या दोन्ही लढतींत गोलंदाजांच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेल्या भारतीय संघावर आज रविवारी तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याचे दडपण असेल.
भारताने दोन्ही सामन्यांत ३०० वर धावा केल्यानंतरही पराभवाची निराशाच पदरी पडली. गोलंदाज अपयशी ठरल्याने आता विजयासाठी फलंदाजांनाच अतिरिक्त जबाबदारी उचलावी लागेल, अशी कबुली कर्णधार धोनीने दिलीच आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत उमेद कायम राखण्यासाठी तिसरा सामना महत्त्वाचा असल्याची जाणीव भारताला आहे. बांगलादेशात वन डे मालिका गमविल्यानंतर घरच्या मैदानावरही द. आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. आता उद्याचा सामना गमविल्यास सलग तिसरी मालिका गमविण्याचा डाग टीम इंडियावर लागणार आहे. धोनीसाठी हे चांगले चित्र नाही. मागच्यावर्षी पराभवानंतर त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घ्यायला हवी, असे मत व्यक्त झाले. बीसीसीआयने यावर मंथन करीत २०१६ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत माहीकडे नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
झिम्बाब्वे दौऱ्यात धोनी नव्हता, पण पुनरागमनानंतरही त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. नावलौकिकानुसार खेळ अद्याप कायम आहे, हे दाखवून देण्याचे आव्हान धोनीपुढे असेल. आव्हान पेलण्यासाठी धोनीला गोलंदाजांची समर्थ साथ लागेल. गोलंदाजांच्या अपयशामुळेच आॅस्ट्रेलियाने ३०० वर धावांचा पाठलाग करीत दोन्ही सामने जिंकले. इतक्या धावांचा बचाव गोलंदाज करीत नसतील, तर काय उपयोग? आता धोनी फलंदाजांकडून ३३०-३४० धावांची अपेक्षा बाळगत आहे. रोहित शर्मा आणि कोहली फॉर्ममध्ये आहेत, पण अखेरच्या षटकांत धावा निघताना दिसत नाहीत. अजिंक्य रहाणे याने मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली, तरीही त्याला अतिरिक्त जबाबदारी उचलण्याची गरज असेल. शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहेच. गोलंदाजीत पाच जण खेळवायचे का, हादेखील धोनीसाठी चिंतेचा विषय असेल. तरीही निर्णायक असलेल्या या लढतीत संघात काही बदल होतील, असे दिसत नाही. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाची स्थिती भक्कम असल्याने सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळविण्याचे त्यांचे मनसुबे असतील.(वृत्तसंस्था)
हेजलवूड वन-डे मालिकेबाहेर
भारताविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. जॉन हेस्टिंग्ज त्याचे स्थान घेईल. हेजलवूडला उन्हाळ्यात सहा कसोटी सामने खेळायचे असल्याने त्याला आराम देण्यात येत आहे. तो फिट होऊन परातावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे
कोच डेरेन लेहमन म्हणाले.
मेलबोर्नच्या मैदानावर आॅस्ट्रेलिया संघाने ९ जानेवारी २००४ रोजी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताविरुद्ध ४८.३ षटकांत २८८ धावा केल्या होत्या. नंतर भारताने २८९ चे लक्ष्य समोर ठेवून ४९ षटकांत २७० धावा केल्या होत्या.
या मैदानावर भारत व आॅस्ट्रेलिया यांच्या आतापर्यंत १३ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५, तर आॅस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले आहेत.
सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माने या मैदानावर १८ जानेवारी २०१५ रोजी १३९ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांच्या साहाय्याने १३८ धावांची आक्रमक खेळी केली होती. रोहितने या मालिकेत दोन्ही लढतींमध्ये शतके ठोकली आहे.
या मैदानावर ईशांत शर्माने १० फेब्रुवारी २००८ रोजी ९.१ षटकात ३८ धावा देऊन ४ विकेट घेतल्या होत्या.
भारत : महेंद्रसिंह धोनी कर्णधार, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर शरण.
आॅस्ट्रेलिया : स्टीवन स्मिथ कर्णधार, अॅरोन फिंच, शॉन मार्श, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), जेम्स फॉल्कनर, जॉन हेंस्टिग्स, स्कॉट बोलँड, जोएल पेरिस.
- सामन्याची वेळ सकाळी ८.५० पासून