पाकसाठी ‘करा अथवा मरा’
By admin | Published: June 7, 2017 12:33 AM2017-06-07T00:33:27+5:302017-06-07T00:33:27+5:30
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी आज, बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे.
बर्मिंघम : सलामी लढतीत भारताविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी आज, बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे.
पहिल्या सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध १२४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, तर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा ९६ धावांनी पराभव केला. आणखी एक पराभव पाक संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्यास पुरेसा ठरेल, पण जागतिक वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करणे सोपे नाही.
भारताविरुद्ध सहज पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांपुढे चांगली कामगिरी करण्याचे दडपण राहील. भारताच्या वेगवान गोलंदाजांना समर्थपणे तोंड देण्यात अपयशी ठरलेल्या पाकच्या फलंदाजांना त्या तुलनेत अधिक धारदार वेगवान मारा असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान पेलता येईल का, याबाबत उत्सुकता आहे. रबाडाच्या नेतृत्वाखाली या संघात मोर्नी मोर्कल व वेन पार्नेल या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांवर माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. आता पाकच्या फलंदाजांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. दुसरीकडे ख्रिस मॉरिसची आयपीएलमधील अष्टपैलू कामगिरी बघितल्यानंतर तो कुठल्याही संघाविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास सज्ज असल्याची प्रचिती येते. (वृत्तसंस्था)
(वृत्तसंस्था)
फलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाची भिस्त हाशिम अमला, कर्णधार एबी डिव्हिलियर्स आणि फॅफ ड्यूप्लेसिस यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. डिव्हिलियर्स मोठी खेळी करण्यात उत्सुक असेल.
वेगवान गोलंदाजी पाक संघाची मुख्य शक्ती आहे, पण सध्या प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंची पाक संघात वानवा आहे. या व्यतिरिक्त पाक संघाला कामगिरीतही सातत्य राखता आलेले नाही.
दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम अमला, फरहान बेहार्डियन, क्विंटन डिकाक, जेपी ड्युमिनी, फॅफ ड्यूप्लेसिस, इम्रान ताहिर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मोर्नी मोर्कल, ख्रिस मॉरिस, वेन पारनेल, एंडिले पी, ड्वेन प्रिटोरियस आणि कागिसो रबाडा.
पाकिस्तान : सरफराज खान (कर्णधार), अहमद शहजाद, अझहर अली, बाबर आजम, फहीम अशरफ, फखार जमान, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, जुनेद खान, मोहम्मद आमिर, मोहम्मद हफीज, शादाब खान आणि शोएब मलिक.