लाजिरवाणा पराभव !
By admin | Published: January 31, 2015 03:38 AM2015-01-31T03:38:57+5:302015-01-31T03:38:57+5:30
करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या लढतीत भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. भारताचा डाव ४८.१ षटकांत २०० धावांत संपुष्टात आला
पर्थ : आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यात टीम इंडियाला अद्याप यश मिळालेले नाही. कसोटी मालिकेत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेतूनही शुक्रवारी गाशा गुंडाळावा लागला. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे तिरंगी मालिकेत भारतीय संघाला आज इंग्लंडविरुद्ध तीन गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारताचे तिरंगी मालिकेतील आव्हान संपुष्टात आले. आता रविवारी यजमान आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांदरम्यान तिरंगी मालिकेची अंतिम झुंज रंगणार आहे.
‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या लढतीत भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. भारताचा डाव ४८.१ षटकांत २०० धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. त्यानंतर अन्य फलंदाजांना ४० धावांची वेस ओलांडता आली नाही. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे भारताचा डाव २०० धावांत आटोपला. भारताची एकवेळ १ बाद १०३ अशी मजबूत स्थिती होती.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची ५ बाद ६६ अशी अवस्था झाली होती, पण जेम्स टेलर (८२) व जोस बटलर (६७) यांनी सहाव्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी करीत इंग्लंडच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. इंग्लंडने १९ चेंडू शिल्लक राखून विजय साकारताना अंतिम फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
टेलरने १२२ चेंडूंना सामोरे जाताना संयमी अर्धशतकी खेळी केली. त्यात ४ चौकारांचा समावेश आहे. बटलरच्या ७७ चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकारांचा समावेश आहे. भारतातर्फे स्टुअर्ट बिन्नीने ३३ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. दोन आठवड्यानंतर विश्वकप स्पर्धेत सहभागी
होणाऱ्या भारतीय संघाच्या गोलंदाजांमध्ये आत्मविश्वासाची उणीव जाणवली. भारताची आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी निराशाजनक ठरली. भारताला या दौऱ्यात एकही विजय मिळविता आला नाही.
त्याआधी, इंग्लंडतर्फे स्टिव्हन फिनने ३६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत भारताचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ख्रिस व्होक्स, स्टुअर्ट ब्रॉड व फिरकीपटू मोईन अली यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. या लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
फॉर्मात नसलेला शिखर धवन (३८) व अजिंक्य रहाणे यांनी भारताला सावध सुरुवात करून दिली. भारताने १० षटकांत केवळ ३४ धावा केल्या होत्या. त्यानंतर रहाणेने आक्रमक पवित्रा स्वीकारला. भारताने १४व्या षटकात धावसंख्येचे अर्धशतक गाठले. धवनला सूर गवसल्याचे संकेत मिळत असताना तो २१ व्या षटकात व्होक्सच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक बटलरकडे झेल देत माघारी परतला. रहाणेने २५व्या षटकात वन-डे कारकिर्दीतील वैयक्तिक ८वे अर्धशतक पूर्ण केले.
विराट कोहली (८) व सुरेश रैना (१) मोईन अलीचे लक्ष्य ठरले. अंबाती रायडू (१२), स्टुअर्ट बिन्नी (७), कर्णधार धोनी (१७), रवींद्र जडेजा (५) व अक्षर पटेल (१) यांना मोठी खेळी करता आली नाही. मोहम्मद शमी (२५) व मोहित शर्मा (७) यांनी अखेरच्या गड्यासाठी ३५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला.
(वृत्तसंस्था)