मल्ल बजरंग पुनिया सुवर्णमय कामगिरीसह अव्वल स्थानावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 03:19 AM2021-03-09T03:19:44+5:302021-03-09T03:19:52+5:30
बजरंग आता राष्ट्रीय शिबिरात सहभागी होऊ इिच्छतो, मात्र त्याला ९ ते १३ एप्रिल या कालावधीत कझाखस्तानमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशिपआधी विदेशात सराव करायचा आहे
रोम : टोकियो ऑलिम्पकच्या तयारीत असलेला मल्ल बजरंग पुनियाने अखेरच्या ३० सेकंदात दोन गुणांची शानदार आघाडी घेत माटियो पेलिकोन रॅंकिंग कुस्ती सिरिजचे सुवर्णपदक जिंकले. या जेतेपदाचा बचाव करणारा बजरंग ६५ किलो वजन गटात पुन्हा नंबर वन मल्ल बनला.
मंगोलियाचा तुल्गा तिमूर याच्याविरुद्ध अंतिम फेरीत बजरंग ०-२ ने माघारला होता. मात्र अखेरच्या काही सेकंदांत दोन गुणांची मुसंडी मारून बजरंगने जेतेपदावर नाव कोरले. २७ वर्षांच्या बजरंगचा बचाव बलाढ्य होताना दिसत आहे.
बजरंग आता राष्ट्रीय शिबिरात सहभागी होऊ इिच्छतो, मात्र त्याला ९ ते १३ एप्रिल या कालावधीत कझाखस्तानमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशिपआधी विदेशात सराव करायचा आहे. तो म्हणाला, ‘मी विदेशात सराव करू इच्छितो. युरोपात प्रवासावर निर्बंध असून, कोरोनाची स्थिती वाढत आहे. या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यामुळे हे शक्य होईल, असे म्हणता येणार नाही.’ या स्पर्धेआधी बजरंग ६५ किलो गटात दुसऱ्या स्थानावर होता. येथे १४ गुणांची कमाई केल्याने तो पुन्हा नंबर वन बनला.
विशाल कालिरमन याने ७० किलो वजन गटात प्रभावी कामगिरी करीत कझाखस्तानचा मल्ल सीरबाज तालगत याला ५-१ ने नमवून कांस्य जिंकले. दरम्यान, डोपिंगमुळे चार वर्षांच्या बंदीनंतर रिंगणात आलेला नरसिंग पंचम यादव हा मात्र कांस्य पदकाच्या लढतीत कझाखस्तानचा मल्ल दानियार कैसानोव याच्याकडून पराभूत झाला.
‘कोरोना काळात माझ्या बचाव करण्याच्या तंत्रात सुधारणा झाली. तरीही यावर मेहनत घेत आहे. आक्रमक हालचाली अधिक तीव्र कराव्या लागतील. मंगोलियाच्या खेळाडूविरुद्ध लढत फार खडतर होती. ६५ किलो वजन गटात मंगोलियाच्या खेळाडूनेदेखील पात्रता गाठली असल्याने ऑलिम्पिकमध्ये कडवे आव्हान असेल. आम्हा सर्व मल्लांचा स्तर सारखा असल्यामुळे अनेक संभाव्य विजेते आहेत.’ - बजरंग पुनिया
भारताने यंदा या पहिल्या रॅंकिंग सिरिजमध्ये सात पदके जिंकली. महिला गटात विनेश फोगाट हिने सुवर्ण, तर सरिता मोरे हिने रौप्य जिंकले. ग्रीको रोमन प्रकारात नीरज यादवने ६३ किलो गटात, कुलदीप ७२ आणि नवीन कुमार याने १३० किलो वजन गटात कांस्य पदके जिंकली. यानंतर बजरंगने सुवर्ण, तर कालिरमन याने कांस्य पदकाची कमाई केली.