महाराष्ट्र केसरी गट लढतींत मल्ल सागर मारकड, रणजित नलावडे यांनी गाजविला दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:57 AM2017-12-21T01:57:35+5:302017-12-21T01:57:58+5:30
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गट लढतींत मल्ल सागर मारकड, रणजित नलावडे यांनी दिवस गाजविला. सागर मारकडने माती गटात स्पर्धेतील पहिले सुवर्ण जिंकत यजमान पुणे संघाचे वर्चस्व गाजवले. तर कोल्हापूरचा राष्ट्रकुलपदक विजेता रणजितने विक्रमी ९ वे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. गादी विभागात ५७ किलो गटात कोल्हापूरच्या विजय पाटीलने साताºयाच्या प्रदिप सुळचा ११-० गुणांनी पराभव करुन विजेतेपद जिंकले़
गोरख माझिरे
भूगाव : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गट लढतींत मल्ल सागर मारकड, रणजित नलावडे यांनी दिवस गाजविला. सागर मारकडने माती गटात स्पर्धेतील पहिले सुवर्ण जिंकत यजमान पुणे संघाचे वर्चस्व गाजवले. तर कोल्हापूरचा राष्ट्रकुलपदक विजेता रणजितने विक्रमी ९ वे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. गादी विभागात ५७ किलो गटात कोल्हापूरच्या विजय पाटीलने साताºयाच्या प्रदिप सुळचा ११-० गुणांनी पराभव करुन विजेतेपद जिंकले़
भूगाव येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत बुधवारी सकाळपासून चितपट लढतींचा आनंद कुस्तीशौकिनांना मिळाला. सकाळच्या सत्रात ५७ किलो माती गटात राष्ट्रीयपदक विजेता सोलापूरचा ज्योतिबा अटकळने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करीत अंतिम फेरीत धडक मारली. त्यांच्यापुढे इंदापूरमध्ये सराव करणाºया सागर मारकडचे आव्हान होते. मॅटवरील राष्ट्रीय विजेता ज्योतिबाकडे संभाव्य विजेते गणला गेला होता. मात्र, मातीवर सराव करणाचा अनुभव असणाºया २१ वर्षीय सागरने सलग दुसºया वर्षी गटातील सुवर्णपदकावर नाव कोरले.
पहिल्या फेरीत काका पवारच्या आंतरराष्ट्रीय संकुलात सराव करणाºया १-० ची आघाडी घेतली होती. दोघेही नकारात्मक कुस्ती करत असल्याने सुरुवात रटाळ झाली. निर्णायक दुसºया फेरीत मारकडने पहिल्याच मिनिटाला कलाजंग डाव करीत आक्रमक पवित्रा घेतला. तो असफल होताच त्याने भारद्वाज डावावर ४ गुणांची कमाई करीत पुणे जिल्ह्याच्या पदक तक्यात पहिले खाते उघडले. वडील मारुती मारकड यांच्या मार्गदर्शनाद्वारे सागरने आपला ठसा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत उमटविला आहे. रिपेचेसच्या कांस्यपदकाच्या लढतीत उस्मानाबादच्या दत्तात्रस मेटे आणि पुण्याच्या प्रशांत साठेने विजय संपादन केला. उस्मानाबादच्या हनुमंत पुरीने एकतर्फी खेळ करीत ७९ माती विभागातील अजिक्यपद कमावले. अहमदनगरच्या अजित शेळकेला
८-४ गुणांनी नमवून हनुमंतने सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. सोलापूरच्या नंदकुमार काकडे, पुणेच्या नागेश राक्षेने कांस्यपदके मिळविली.
रणजीतची शुभमवर मात-
पुण्यापाठोपाठ कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर रणजीतने ७९ किलो मॅट गटात आपली हुकुमत कायम राखली. नाशिकच्या शुभम शिंदेवर त्याने
९-३ गुणांनी मात करीत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. पहिल्या फेरीत छडी टांगवर धोकादायक स्थिती निर्माण करीत रणजीतने चार गुण वसूल केले. दुसºया फेरीतही भारद्वाजवर ४ गुणांची कमाई करीत त्याने आपला विजय निश्चित केला. शेवटच्या मिनिटाला थकलेल्या रणजितला मागे ढकलित शुभमने ३ गुण मिळवले. २००८ सांगलीमध्ये रणजितने पहिले सुवर्णपदक राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जिंकले होते. तेव्हापासून त्याचा सुवर्ण झंझावत सुरूच राहिला आहे. फ्री स्टाईल प्रकारात ट्रिपल हॅट्ट्रिकचा करिश्मा करणाºया रणजितने ग्रिकोरोमन प्रकारातही राज्य स्पर्धेत पदकाचा चौकार झळकविला आहे.