मानसी चिपळूणकरला तिहेरी संधी
By admin | Published: September 11, 2015 12:32 AM2015-09-11T00:32:08+5:302015-09-11T00:32:08+5:30
गतविजेत्या शुभम् आंब्रे व मानसी चिपळूणकर यांनी मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिलांच्या अंतिम सामन्यात धडक मारली. मानसीने महिला गटासह
मुंबई : गतविजेत्या शुभम् आंब्रे व मानसी चिपळूणकर यांनी मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिलांच्या अंतिम सामन्यात धडक मारली. मानसीने महिला गटासह मुलींच्या ज्युनियर व युवा गटात अंतिम फेरी गाठली असल्याने तिला स्पर्धेत तिहेरी विजेतेपदाची संधी चालून आली आहे.
पुरुष गटात एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात शुभम्ने हरीश शिरसाटचे आव्हान ११-९, ११-९, ११-८, ११-७ असे संपुष्टात आणून अंतिम फेरी गाठली. अव्वल मानांकित परेश मुरेकरला मात्र विजयासाठी झुंजावे लागले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात त्याने तन्मय राणेचा ११-९, ११-८, ११-४, ८-११, ११-६ असा पराभव केला.
दुसऱ्या बाजूला महिलांच्या गटात मानसीने तब्बल सात सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत झुंजार खेळाचे प्रदर्शन करत क्रिशा अगरवालला ९-११, ११-८, ६-११, ९-११, ११-४, ११-६, ११-५ असे लोळवले. विजेतेपदासाठी मानसीसमोर अव्वल मानांकित श्वेता पार्टेचे तगडे आव्हान असेल. ज्युनियर गटात मानसीने सहज अंतिम फेरीत प्रवेश करताना मिसबाह सुमरचा ११-१, ११-१, १४-१२, ११-५ असा धुव्वा उडवला. तसेच युवा गटामध्ये अव्वल मानांकित असलेल्या मानसीने अपेक्षित कूच करताना हिया दोशीचे आव्हान १२-१०, ११-७, ११-५, १४-१२ असे परतावून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. (क्रीडा प्रतिनिधी)