मॅन्चेस्टर युनायटेड अपराजित
By admin | Published: January 2, 2015 01:38 AM2015-01-02T01:38:35+5:302015-01-02T01:38:35+5:30
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करून मजबूत पकड घेऊ पाहणाऱ्या स्टोक सिटीला गुरुवारी ‘ड्रॉ’वर समाधान मानावे लागले.
स्टाफोर्डशायर : सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करून मजबूत पकड घेऊ पाहणाऱ्या स्टोक सिटीला गुरुवारी ‘ड्रॉ’वर समाधान मानावे लागले. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान असलेल्या मॅन्चेस्टर युनायटेडला रॅडमेल फाल्काओच्या निर्णायक गोलने पराभवातून वाचवले. २८व्या मिनिटाला फाल्काओने केलेल्या गोलमुळे ही लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. या ड्रॉमुळे युनायटेडने गेल्या १० लढतींत अपराजित राहण्याचा विक्रम आबाधित राखला आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच यजमान स्टोक सिटी संघाने आक्रमणावर भर दिला होता. दुसऱ्याच मिनिटाला त्याचे फळ सिटीला मिळाले. उजव्या कॉर्नरवरून पिटर क्रंच याच्याकडून आलेल्या पासवर रियान शॉक्रॉस याने अचूक गोल करून सिटीला आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे चवताळलेल्या युनायटेडने मग आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्यांना अनेक संधीही मिळाल्या, परंतु सिटीच्या बचावासमोर त्यांना यश मिळवण्यात अपयश आले. १९व्या मिनिटाला मार्को अॅर्नोटोविक याची गोल करण्याची संधी हुकली आणि युनायटेडने सुटकेचा नि:श्वास सोडला. सिटीच्या या खेळाडूने युनायटेडची बचाळफळी भेदून गोलपोस्टच्या दिशेने आगेकूच केली होती, परंतु युनायटेडच्या गोली डेवीड दे गेया याने चेंडू अडविला. डेवीडच्या या बचावाने प्रभावित झालेल्या युनायटेडने २६व्या मिनिटाला सामन्यात बरोबरी मिळवली. रॅडमेल फाल्काओने मायकल कॅरिक याच्या पासवर अप्रतिम गोल करून युनायटेडचे खाते उघडले. मध्यांतरापर्यंत दोन्ही संघांमधील टशन अशीच कायम राहिल्याने सामना १-१ असा बरोबरीत होता. मध्यांतरानंतर सामन्यातील चुरस आणखी वाढली. दोन्ही संघांमध्ये रंगलेली चढाओढ पाहून बाजी कोण मारणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. मात्र, शेरास शव्वाशेर अशी कामगिरी दोन्ही संघांनी केल्याने सामना बरोबरीत सुटला. (वृत्तसंस्था)
च्मॅन्चेस्टर सिटीने ३-२ने सदरलँडला नमवून अव्वल स्थानाकडे आगेकूच केली आहे. या विजयाबरोबर सिटीच्या खात्यात ४६ गुण जमा झाले आहेत. सिटीकडून याया टोरे, स्टीवन जोवेटिक आणि फ्रँक लेपर्ड यांनी, तर सदरलँडकडून जे रोडवेल व ए जॉन्सन यांनी प्रत्येकी एक गोल केला.
च्हल सिटी आणि साऊथअॅम्पटन यांनी अनुक्रमे एव्हर्टन आणि आर्सेनल संघांना २-० असा पराभवाचा धक्का दिला. या विजयामुळे हल सिटीने १५वे स्थान, तर साऊथअॅम्पटनने चौथे स्थान पटकावले आहे.
च्अॅस्टन विला व क्रिस्टल पॅलेस (०-०), लिव्हरपुल व लेकेस्टर सिटी (२-२), न्युकास्टल युनायटेड व बर्नलेय (३-३), क्विन्स पार्क रेंजर्स व स्वानसी सिटी (१-१), वेस्ट हॅम युनायटेड व वेस्ट ब्रामविक (१-१) या लढती बरोबरीत सुटल्या.
14सामन्यांत युनायटेडने स्टोक सिटीला ११ वेळा पराभवाची चव चाखवली असून, केवळ एकदाच पराभव स्वीकारला आहे. दोन लढती बरोबरीत सुटल्या.
53गोल करण्यात पिटर क्रंच याचा हातभार लागला असून, ईपीएलमध्ये सर्वाधिक गोल करण्यात मदत करणाऱ्या रॉबीन वॅन पर्सी याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे.
2012नंतर पहिल्यांदाच मायकल कॅरिक याने संघाला गोल करण्यात हातभार लावला.