मनिका बत्राच्या विजयाने रचला इतिहास; भारत पहिल्यांदाच टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 06:02 PM2024-08-05T18:02:49+5:302024-08-05T18:07:02+5:30
Manika Batra Table Tennis, India at Paris Olympics 2024: भारत-रोमानिया २-२ अशा बरोबरीत असताना मनिका जिंकली निर्णायक मॅच
Manika Batra Table Tennis, India at Paris Olympics 2024: अनुभवी खेळाडू मनिका बत्राच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिला टेबल टेनिस संघाने इतिहास रचला. भारतीयटेबल टेनिस संघ प्रथमच ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. राउंड ऑफ 16 च्या सामन्यात भारताने रोमानियाचा ३-२ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना अमेरिका किंवा जर्मनीशी होईल. निर्णायक लढतीत मनिका बत्राने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारताने पहिल्यावहिल्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली.
असा रंगला भारत-रोमानिया सामना
भारतासाठी श्रीजा अकुला आणि अर्चना गिरीश कामत या जोडीने दुहेरीचा सामना जिंकून आघाडी घेतली, त्यानंतर मनिकाने आपला एकेरी सामना जिंकून २-० अशी आघाडी घेतली. मात्र, श्रीजा अकुला आणि अर्चना गिरीश कामत यांनी आपापले एकेरीचे सामने गमावले. त्यामुळे रोमानियाने २-२ अशी बरोबरी साधली होती. निर्णायक सामना खेळण्यासाठी मनिका बत्रा कोर्टवर आली. मनिका बत्राने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत प्रतिस्पर्ध्याच्या ११-५, ११-९ आणि ११-९ असा पराभव करत भारतासाठी इतिहास रचला.
A clutch game from Manika Batra 🔥 #TeamIndia's ace wins the decider to seal a quarter final spot!💥🏓https://t.co/dyN6C3pQug#Cheer4Bharat#OlympicsonJioCinema#OlympicsonSports18#JioCinemaSports#TableTennis#Olympicspic.twitter.com/u4kfGbzWic
— JioCinema (@JioCinema) August 5, 2024
श्रीजा अकुला आणि अर्चना कामथ यांनी दुहेरीच्या सामन्यात एडिना डायकोनू आणि एलिझाबेथ समारा यांच्यावर ११-९, १२-१०, ११-७ असा विजय नोंदवला होता. मनिकाने तिच्या एकेरीच्या सामन्यात बर्नाडेट झॉक्सचा ११-५, ११-७, ११-७ असा पराभव केला होता. नंतर भारताला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. अखेर भारताकडून मनिकाने अनुभवाचा वापर करत संघाचे आव्हान जिवंत ठेवले.