युवा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत नांदगावच्या मंजिरीने पोलंडमध्ये पटकावले कांस्य पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 10:33 PM2021-08-16T22:33:31+5:302021-08-16T22:33:50+5:30
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी येथील खेळाडूने ब्रांझ पदक पटकावताच सातासमुद्रापार पोलंड देशात भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजली अन् क्षणभर सारेच मंत्रमुग्ध होऊन भारावले.
अमरावती: पोलंड येथील युवा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी मनोज अलोने हिला वैयक्तिक ब्राँझ पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच तिचा भारतीय संघातही समावेश होता. भारतीय संघानेही येथील स्पर्धेत लढत देऊन ब्राँझ पदक पटकाविले आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी येथील खेळाडूने ब्रांझ पदक पटकावताच सातासमुद्रापार पोलंड देशात भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजली अन् क्षणभर सारेच मंत्रमुग्ध होऊन भारावले. काल हे वृत्त नांदगावात कळताच क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता. मंजिरी अलोने ही येथील एकलव्य गुरुकुल स्कूलमधील इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी आहे. येथील प्रशिक्षक अमर जाधव यांनी तिचा येथील मैदानावर नियमित सराव करवून घेतला.
तिच्या या कामगिरीबद्दल राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त सदानंद जाधव, उत्तमराव मुरादे, विलास मारोटकर, विशाल ढवळे, अनूप काकडे, उमेश परसनकर, पवन जाधव, क्रीडा अकादमीचे पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले.